• Sat. Dec 28th, 2024
    आता लाज वाटू लागलीय! राज ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा निर्णय; अंजली दमानियांचे आभार

    Prakash Mahajan: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशीतले अनेक तरुण शस्त्रं बाळगत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशीतले अनेक तरुण शस्त्रं बाळगत आहेत. त्याच्या जोरावर लोकांना धमकावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील शस्त्रधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुढे आणली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक स्तुत्त्य निर्णय घेतला आहे.

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील शस्त्रधारकांबद्दल मांडलेली वस्तुस्थिती पाहून मी माझा शस्त्र परवाना शासनाला परत करण्याच्या मनस्थितीत आलो आहे, असं महाजन यांनी सांगितलं. ‘माझ्याकडे शस्त्र आणि ते बाळगण्याचा परवाना आहे. पण त्या शस्त्राच्या आधारापेक्षा आता त्याची बदनामीच जास्त व्हायला लागली आहे. मी शेती करताना शस्त्र घेतलं होतं. आता मी शेती करत नाही. लोकसभा असो वा विधानसभेच्या निवडणुका, जेव्हा जेव्हा शासनाचे आदेश आले, तेव्हा तेव्हा मी माझ्याकडे असलेलं शस्त्र जमा केलं आहे,’ असं महाजन यांनी सांगितलं.
    एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार; धस यांनी नवा बॉम्ब टाकला; आका पुन्हा रडारवर
    ‘मी अंजली दमानिया ताईंचे आभार मानेन. मी आज बीडला आहे. मी उद्या संभाजीनगरला गेल्यावर तिथल्या पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. माझं शस्त्र आणि परवाना अशा दोन्ही वस्तू मी जमा करेन. शासनाला माझी फक्त एकच विनंती आहे की माझ्याकडे चांगलं शस्त्र आहे. शासनानं ते चांगल्या दरात विकत घेऊन दोन पैसे मला दिले तर या वयात मला त्या पैशांचा चांगला उपयोग करता येईल,’ अशी विनंती महाजन यांनी केली.

    ‘बीडमधील सगळ्या गोष्टी उघड केल्याबद्दल मी अंजली ताईंचे आभार मानतो. शस्त्र परवान्याचा मी कधीच गैरवापर केला नाही. पण आता मला त्याची थोडी लाज वाटू लागली आहे. शस्त्रं असलेल्यांनी त्याचं आता इतकं ओंगळवाळं प्रदर्शन केलंय की आपल्याकडे शस्त्र आहे ते सांगायला लाज वाटू लागलीय. कशासाठी शस्त्राचा वापर होतोय? लोकांना धमकावण्यासाठी का?,’ असे उद्विग्न सवाल त्यांनी विचारले.
    प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंधाना; ‘कार्यक्रम’ सांगत सुरेश धस यांचा ‘आकां’वर निशाणा
    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोनच दिवसांपूर्वी बीडमधील शस्त्रधारकांची यादीच समोर आणली आहे. ‘बीडमधील पिस्तुलधारकांच्या संख्येवरुन अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘बीडमध्ये पिस्तुलांचं थैमान? १२२२ शस्त्र परवानाधारक? इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत ३२ आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये २४३ शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरदहस्ताने? १२२२ अधिकृत शस्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील?,’ असा सवाल दमानिया यांनी विचारला होता.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed