Suraj Chavan Ajit Pawar Meet : बिग बॉस मराठी पाचचा विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर तो अजित पवारांच्या भेटीला गेला होता. यावेळी अजित पवार यांच्याकडून सूरज चव्हाण याचा सत्कार देखील करण्यात आला. आता परत सूरजने अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर तो माध्यमांशी बोलताना दिसला.
बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. हेच नाही तर अजित पवार यांनी सूरज चव्हाणचा सत्कार देखील केला होता. बिग बॉसच्या घरात असताना अनेकदा सूरजने स्वत:चे घर बांधायचे असल्याचे म्हटले होते. अजित पवार यांनी सूरज चव्हाणचा सत्कार करत म्हटले होते की, मी सूरजला राहण्यासाठी चांगले घर बांधून देणार आहे. आता त्याबद्दलच बोलताना सूरज चव्हाण हा दिसलाय.
अजित पवार उपमुख्यमंत्री होताच बिग बॉस विजेता सूरज चव्हाण भेटीला, म्हणाला, दादा यांचा शब्द आहे तो पूर्ण होणार
अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण हा त्यांच्या भेटीला गेला होता. यावेळी बोलताना सूरज चव्हाण हा म्हणाला की, दादांना माझ्याकडून खूप खूप लई शुभेच्छा. म्हणजे मलाच भेटायचे होते दादांना. कधी येऊ दादांना भेटालया असे मला झाले होते आणि घराचे काम सध्या जोरात चालू आहे.
दादा बोलतात ते काम करतात. दादा देवमाणूस आहेत. दादांचा शब्द आहे ते पूर्ण होणारच, असेही सूरज चव्हाण याने म्हटले आहे. सूरज चव्हाण याने आज अजित दादांना भेटण्याचे कारण देखील सांगितले असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे त्याने म्हटले आहे. मोठी मोठी कामे सुरू असल्याचे सूरजने म्हटले. यावेळी सूरज चव्हाण हा आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना देखील दिसला आहे.