• Sun. Dec 29th, 2024
    ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या शरद पवारांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा; थेट आकडेवारी मांडत दिले उत्तर

    Devendra Fadnavis commented on Sharad Pawar Statement: सर्व एक्झिट पोल खोटे ठरवत महायुतीने मोठी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचा केवळ ५० जागांपेक्षाही कमीवर समाधान मानावे लागले आहे. परिणामी या निकालावर पवारांनी आक्षेप घेतला आहे. शरद पवारांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र डागले आहे.

    मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले असून पुन्हा सत्तेत विराजमान ुझाली आहे. सर्व एक्झिट पोल खोटे ठरवत महायुतीने मोठी बाजी मारली आहे. भाजपचा तब्बल १३२ जागांवर विजय झाला आहे तर महायुतीचा २३५ जागांवर डंका वाजवला आहे. महाविकास आघाडीचा केवळ ५० जागांपेक्षाही कमीवर समाधान मानावे लागले आहे. परिणामी या निकालावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच हा निकाल संशयास्पद असल्याचे देखील राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यातच शरद पवार यांनी देखील ईव्हीएम प्रणालीवर संशय व्यक्त केला. शरद पवारांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र डागले आहे. तर मतांची आकडेवारी देखील मांडली आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स हँडलवर पोस्ट लिहून शरद पवारांवर खोचक टीका केली. ‘श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?’ असे फडणवीस म्हणाले. तर पुढे त्यांनी गत निवडणुकीतील मतांची आकडेवारी देखील मांडली आहे. ते म्हणाले, ‘पवार साहेब चला २०२४ च्या लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9 पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. यासोबतच 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या.

    ‘साहेब पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे,’ अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केली. फडणवीसांनी ही आकडेमोड दाखवत एकप्रकारे पक्षाची मते आणि जागांमधील तफावत दाखवली आहे. शरद पवारांसोबतच विरोधक कसे प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

    काय म्हणाले शरद पवार?

    पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना पवार म्हणाले, राज्यात महायुतीचा धक्कादायक विजय झालेला आहे. चार राज्याच्या निवडणूका झाल्या आहेत. हरियाणात निवडणूका झाल्या तेव्हा आपण तेथे गेलो होतो. तिथेही भाजपाची स्थिती अत्यंत कठीण होती. पण भाजपा अचानक सत्तेत आली. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र फारुख अब्दुल्ला आले. काँग्रेसला अत्यंत कमी मते मिळाली. महाराष्ट्रात भाजपला मोठे यश मिळाले असले तरी त्याचवेळी झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात. दोन निवडणुकीमध्ये एका ठिकाणी तुम्ही जिंकला, दुसऱ्या ठिकाणी आम्ही जिंकलो. मग त्यात ईव्हीएमचा काहीच संबंध नाही? एक चित्र दिसतंय की, मोठी राज्य तिथे भाजप तर छोटी राज्य आहेत तिथे अन्य पक्ष निवडून आलेले आहेत, असेही पवारांनी नमूद केले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed