• Sat. Jun 6th, 2026
    Crime News : मुलगी नको, घरातच गर्भपाताचं रॅकेट, पोटच्या गोळ्याला पोटातच संपवलं, छ.संभाजीनगरमधील घटना उघड

    Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ते जाणून घ्या.

    छत्रपती संभाजीनगर गर्भपात रॅकेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मुलगाच हवा या हट्टापायी पोटच्या गोळ्याची हत्या करण्याचा संतापजनक प्रकार नारेगाव परिसरात उघडकीस आला आहे. एका 26 वर्षीय विवाहितेचा तिच्या संमतीशिवाय घरातच बळजबरीने गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी मोठी कारवाई करत, गर्भपाताचे रॅकेट चालवणारा कुख्यात डॉक्टर, एक परिचारिका आणि पीडितेच्या पतीसह सासू-सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. डॉ. सतीश सोनवणे कुख्यात रेडिओलॉजिस्ट आणि मुख्य सूत्रधार अरबाज सय्यद पीडित विवाहितेचा पती, फिरोज सय्यद सासरा, आशिया सय्यद सासू, कमल तिनगोटे परिचारिका आणि अनिल जाधव लॅब चालक अशी आरोपींची नावे आहेत.

    विवाहितेला गुंगीचं औषध दिलं

    या घटनेतील मोठी बाब म्हणजे हे संपूर्ण रॅकेट अत्यंत छुप्या पद्धतीने चालवले जात होते. पीडित विवाहितेच्या पतीने डॉ. सतीश सोनवणे याला गर्भपातासाठी सुपारी दिली होती. डॉ. सोनवणे याने ट्रिमरच्या आकाराच्या एका पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा वापर करून विवाहितेच्या घरातच तिचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले. पोटात मुलगी असल्याचे स्पष्ट होताच, सासरच्या मंडळींनी डॉक्टर आणि एका परिचारिकेच्या मदतीने तिचा गर्भपात करण्याचा घाट घातला. 6 मार्च रोजी विवाहितेला गुंगीचं औषध देऊन तिचा गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, याचदरम्यान विवाहितेचे वडील अचानक तिथे पोहोचले. त्यांना पाहताच डॉक्टर आणि त्याचे साथीदार साहित्य सोडून पसार झाले. मात्र, तोपर्यंत विवाहितेचा गर्भपात झाला होता. प्रकृती खालावल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे हाती लागले.
    Maharashtra TimesMumbai Crime : डॉ कुलकर्णी ऑपरेशनसाठी आल्या नाहीत? रुग्णालयात धावाधाव, कार्यालयात पाहिलं, महिला डॉक्टरने प्राण सोडलेले

    कुख्यात डॉक्टरचे जाळे सिल्लोड ते बीडपर्यंत

    अटक करण्यात आलेला डॉ. सतीश सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही गर्भपाताचे चार गुन्हे दाखल आहेत. मे 2024 मध्ये त्याला मोठ्या रॅकेटसह अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा आपले जाळे विणले. जालना, सिल्लोड आणि बीडपर्यंत हे रॅकेट पसरलेले असून, 3 ते 5 लाख रुपयांच्या मोबदल्यात हा काळाबाजार सुरू होता. न्यायालयाने सर्व आरोपींना 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा