• Wed. Mar 18th, 2026
    Pune Crime : सिग्नलवर कार थांबताच खिडकीवर ‘टक-टक’, चालकाचं लक्ष भरकटताच गाडीमध्ये चोरी; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

    Pune Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेत कथित ‘टक-टक’ गँगचा समावेश आहे.

    पुणे टक टक गँग कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यात सिग्नलवर वाहनचालकांचं लक्ष विचलित करून मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या ‘टक-टक’ गँगचा पर्दाफाश करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आलं आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने ही कारवाई केली. आरोपी सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनावर मुद्दाम ‘टक-टक’ करत चालकाचं लक्ष वेधून घेत असत. वाहनाने धडक दिल्याचा बहाणा करून वाद घालताना चालकाचं लक्ष दुसरीकडे वळवले जात असे आणि त्याचवेळी कारमधील मोबाईल फोन व इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या जात होत्या.

    लॉजमध्ये येणार असल्याची माहिती

    याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. दरम्यान, आरोपी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओमप्रकाश कोहली (वय 38) आणि अफझल कय्युम अब्बासी (वय 38) अशी असून ते दोघेही मेरठ येथील रहिवासी आहेत.
    Maharashtra TimesSolapur Accident: जीवलग मित्र चहा प्यायला गेले, पण भीषण अपघातात जागीच मृत्यू; कारचा चेंदामेंदा, कुटुंबाचा आक्रोश

    ‘गाडी पायावर गेली’

    चौकशीत दोघांनी फरासखाना परिसरातील मोबाईल चोरीची कबुली दिली. तसेच कर्वे रोड परिसरात उभी असलेल्या कारमधून आयफोन व रोख रक्कम चोरी केल्याचेही उघड झाले. आणखी एका घटनेत विमान नगर चौक येथे कारचालकाला ‘गाडी पायावर गेली’ असा बहाणा करून सॅमसंग व वनप्लस कंपनीचे मोबाईल लंपास केल्याची माहिती समोर आली. शहरातील फरासखाना, अलंकार आणि विमाननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या पथकाने केली. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा