Baramati Yugendra Pawar: युगेंद्र पवार यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांना बारामती मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावं लागलं. याविरोधात त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
युगेंद्र पवारांकडून मत पडताळणीसाठी अर्ज दाखल
याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात उभे ठाकलेले त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
युगेंद्र पवार यांचा आभार दौरा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आजपासून बारामती तालुक्यात आभार दौरा सुरू केला आहे. या आभार दौऱ्यादरम्यान बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, महाराष्ट्रभर संशयाचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामती पुरतेच मर्यादित असतं तर एक वेगळी गोष्ट होती.
पारंपारिक मतदारसंघात इतकं काम करुनही दिग्गज नेत्यांचा पराभव कसा झाला? – युगेंद्र पवार
परंतु राज्यातील जे मोठे मोठे दिग्गज आहेत. ते कधीही न हरणारे नेते आहेत. त्यांचा तिथे पराभव झाला आहे. पारंपारिक मतदार संघात एवढे काम करूनही ते निवडून आले नाहीत. हे का झालं..? न्यायालयाने आम्हाला जो अधिकार दिला आहे की, मतदारसंघातील पाच टक्के बूथ फेर तपासणी करू शकतो. तर त्या अधिकाराचा आम्ही उपयोग का करू नये, असं युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.
आम्ही लोकांपर्यंत जाऊ – युगेंद्र पवार
पाच वर्षांनी पुन्हा विधानसभा येईल. एवढं बहुमत त्यांना मिळालं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं बहुमत कोणाला मिळालं नव्हतं तेवढं आता महायुतीला मिळाले आहे. कारखाने, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीत आम्ही लोकांपर्यंत जाऊ असेही यावेळी ते म्हणाले.