नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आपल्या कन्येसह भाजपच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हान आहे. काँग्रेसने चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली असून, त्यांच्या विरोधात वरिष्ठ नेत्यांच्या सभा आणि प्रचाराद्वारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना माजी मुख्यमंत्री अशोक यांनी विजय मिळवला होता, मात्र २०१९ मध्ये त्यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे चार आमदार निवडून आले. स्थानिक स्वराज्य संस्थेत ही अशोक चव्हाण यांचा दबदबा होता. मात्र फेब्रुवारी मध्ये चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतरही नांदेड लोकसभेची जागा भाजपा जिंकू शकली नाही. त्यामुळे चव्हाण यांना राजकीय दृष्ट्या नामुष्की सहन करावी लागली. खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक होतं आहे. शिवाय जिल्ह्यातील नऊ विधानसभेसाठी मतदार देखील होणार आहे.
जिल्ह्यातील भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड आणि किनवट या पाच जागेवर भाजपने उमेदवार मैदानात उतरवले आहे. शिवाय लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने संतुक हंबर्डे यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे या पाच मतदार संघा पैकी भोकर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण ह्या पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढत आहेत. त्यामुळे आपल्या कन्येसह भाजपच्या इतर उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या समोर अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे. या प्रतिष्ठे सोबत अस्तित्वाच्या लढाईत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कितपत यश मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्येला राजकीय चक्रव्यूहात घेरण्याची रणनीती
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहता चव्हाण परिवाराशिवाय आलेखच पूर्ण होत नाही. त्यातच भोकर विधानसभा मतदारसंघ हा चव्हाणांचा बालेकिल्ला मानला जातो. शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण, अमिता चव्हाण या तिघांनीही या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. आता अशोक चव्हाण यांची सुकन्या श्रीजया चव्हाण ही निवडणुकीसाठी रिंगणात आहे. काँग्रेसने चव्हाण यांच्या विरोधात तिरुपती कोंढेकर यास उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे. त्याला ताकद देण्यासाठी काँग्रेसने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहे. शिवाय अशोक चव्हाण यांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून वरिष्ठ पातळीवरून रणनीती आखली जातं आहे. नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भोकर मध्ये सभा घेतली. शिवाय आता तेलंगणा तेलंगणाचा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे काँग्रेस नेते भोकरला तळ ठोकणार असल्याची माहिती आहे.