भाजपने आपला जाहीरनामा जाहीर केला असून, महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये, तर आशा सेविकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खतावरील एसजीएसटी अनुदान आणि हमीभाव योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यात ५ नवी एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय?
लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० रुपयांवरुन २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देण्यार असल्याची घोषणा भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये केली आहे. २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करणार प्रत्येकी ५०० स्वयंसहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि १००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. अक्षय अन्न योजनेतंर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा देण्यात येणार, यात तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार आहे.
शेतकऱ्यांसाठी काय घोषणा?
शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील एसजीएसटीची रक्कम अनुदानाच्या रुपात परत देणार आहे. शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा केली गेली आहे. शेतमालाची हमीभावाने खरेदी करून भावातर योजनेचे पैसे खात्यात देणार असल्याचं भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये म्हटलं आहे. भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये २५ गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केले गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे,खासदार पियुष गोयल,आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थितीत होते.
सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार आहे. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार. यात को वर्किंग स्पेस, इनक्युबेशन सुविधा असतील. यातून १० लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार आहेत, असंही भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये म्हटलं आहे.