• Sat. Sep 21st, 2024

घरी कुणी चहाला आलं, तर तुम्ही बाहेर जा; तुमचे संबंध आता इलेक्शननंतर, जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना इशारा

घरी कुणी चहाला आलं, तर तुम्ही बाहेर जा; तुमचे संबंध आता इलेक्शननंतर, जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना इशारा

सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत मतभेद बघायला मिळाले होते. गुढीपाडव्याला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सांगली मतदारसंघाची जागा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) लढविणार असल्याचे स्पष्ट केले. ही जागा शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) मिळाल्याने कॉंग्रेसचे नेते नाराज असल्याचे पहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मध्ये प्रचार सभा घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारास विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

जयंत पाटील यांनी सभेत कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, ‘ मागच्या लोकसभेच्या वेळेस तुमच्या बूथवर किती मतदान झाले. प्रत्येक उमेदवारास किती मते मिळाली. शिराळ्यात मानसिंग भाऊ यांना आपल्या पाठिंब्यामुळे किती मते मिळाली तसेच आपल्या मतदारसंघाचा, बूथचा, वार्डचा अभ्यास करा.’

जयंत पाटील यांनी असेही म्हटले की , ‘येत्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हाच्या उमेदवारास म्हणजेच महाविकास आघाडीच्या उमेदवारास विजयी करायचे आहे. आता इलेक्शन होणार आहे त्यामुळे कोणालाही आपल्या घरी येऊ देऊ नका. आपले जे संबंध असतील ते इलेक्शन नंतर ठेवा.’

मविआच्या जागा वाटपात काँग्रेसवर नामुष्की, थोरातांना आपल्याच जिल्ह्यात जागा मिळविता आली नाही – विखे पाटील
महाविकास आघाडीने सांगली मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेस आणि शिवसेनेत गेले काही दिवस खटके उडाले होते. आता उमेदवार जाहीर केला असला तरी सांगलीच्या कॉंग्रेस नेत्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील एक गट मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा पसरल्या आहेत. सांगली मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर वसंतदादा पाटील घराण्याचे वर्चस्व येथे होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पहिला खासदार येथे झाला हा वसंतदादा पाटील घराण्यासाठी राजकीय धक्का होता. २०१९ मध्ये वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला पण ते भाजपात गेल्याने ही जागा पुन्हा भाजपाकडे गेली.

तर महायुतीने सांगली मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे नेते सांगलीतील कॉंग्रेस नेत्यांची समजूत काढण्यास यशस्वी होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed