• Sat. Sep 21st, 2024

‘मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष’, बंडू जाधवांच्या ‘उपऱ्या’ टीकेला महादेव जानकरांकडून प्रत्युत्तर

‘मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष’, बंडू जाधवांच्या ‘उपऱ्या’ टीकेला महादेव जानकरांकडून प्रत्युत्तर

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : माझे इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रे वाचली, त्याचा अभ्यास केला. त्यानंतर निश्चय केला की स्वतःच घर नसावं. लग्न संसार करून मुला बाळासह देशसेवा होऊ शकणार नाही. त्यामुळे मी लग्नही केले नाही आणि संसारही थाटला नाही. तसेच बँकेत अकाउंट देखील काढले नाही, असे विधान परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे मतदारांशी बोलताना केले.

महादेव जानकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे परभणी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिचय करून देताना त्यांच्याबद्दलची माहिती जनतेला दिली. माझे शिक्षण सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाले आहे. दहावीला मी मेरिटमध्ये आलो, त्याचप्रमाणे बारावीला देखील मेरिटमध्ये आलो. त्यामुळे टाटा ट्रस्टकडून मला स्कॉलरशिप मिळाली आहे. त्या स्कॉलरशिपच्या जोरावरच मी सांगली येथील वालचंद कॉलेजमध्ये इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्याचे जानकर यांनी सांगितले.
परभणीत ‘मराठा कार्ड’, सुभाष जावळे लोकसभेचे उमेदवार, चौरंगी लढत होणार

कांशीराम यांच्यासोबत भारत फिरलो

शिक्षण पूर्ण झाल्यानं मी सर्वच महापुरुषांची पुस्तके वाचली. काही ग्रंथ वाचले. त्याच्यावर अभ्यास केला आणि निश्चय केला की आपल्याला समाजसेवा करायची आहे. समाजसेवेमध्ये संसाराचा अडसर येऊ नये म्हणून लग्न देखील केले नाही. २२ वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहिलो, त्यानंतर यशवंतराव होळकर नावाने यशवंत संघटना देखील स्थापन केली. त्यानंतर कांशीरामजी यांच्या सोबतही मी फिरलो. कांशीरामजी यांनी मला संपूर्ण भारत दाखविला. पहिल्यांदा हेलिकॉप्टरने कांशीराम यांच्यासोबत मी प्रवास केला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
परभणीत संजय जाधवांना खासदारकीच्या हॅट्ट्रिकची नामी संधी, शिवाजीराव देशमुखांची बरोबरी करणार?

जानकरांची कामांची जंत्री परभणीकरांसमोर मांडली

राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गावी ३१ मे २००३ रोजी केली. पक्षाची स्थापना केल्यानंतर या पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य केले. माझ्या पक्षाचे बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये माझ्या पक्षाकडून आमदारही झाले. मला युतीच्या काळात मंत्रिपद देखील मिळाले. मी दुग्धविकास मंत्री झालो आणि माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मी त्या खात्याचे सर्व व्यवहार ऑनलाइन केले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या असो की शेतकऱ्यांना देण्यात येणारा अनुदान असो, हे सर्व ऑनलाईन करण्याचा सर्वात पहिला प्रयोग मी केला, अशी कामांची जंत्री त्यांनी परभणीकरांसमोर मांडली.

मीच जानकर, मीच खासदार असं समजून माझा प्रचार करा, महादेव जानकरांचं मतदारांना आवाहन

परभणीचा विकास करेन, सहकार्य करेन

आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून मला परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मला महायुतीमध्ये सर्वच पक्ष सहकार्य करतात. त्यामुळे परभणी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मला परभणीकरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जानकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed