राज्यात सध्या मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा दावा सोशल मीडियावर सातत्याने केला जात आहे. पण मुलं चोरणारी महिला समजून नागपुरात एका 60 वर्षीय महिलेला जमावाकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने ही महिला पोलिसांमुळे बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय महिला आपल्या नेहमीच्या औषधांसाठी रुग्णालयात गेल्या होत्या. औषध घेऊन त्या घरी परत येत असताना दुपारच्या सुमारास त्यांना थकवा जाणवू लागला. तसेच रोजची औषध घेण्याची वेळ झाल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला थांबल्या. त्यावेळी जवळील एका घरासमोर एक लहान मुलगा खेळत होता. औषध घेण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने त्यांनी त्या मुलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, त्या वृद्ध महिलेला मराठी आणि हिंदी भाषा नीट येत नसल्यामुळे त्या भोजपुरी भाषेत बोलत होत्या. त्यामुळे त्यांना आपली गोष्ट स्पष्टपणे सांगता आली नाही. भाषेच्या अडचणीमुळे परिस्थितीचा गैरसमज झाला आणि पुढे त्याचे गंभीर परिणाम दिसून आले.
दरम्यान, त्याच ठिकाणी असलेल्या एका महिलेनं अचानक आरडाओरड करत त्या वृद्ध महिलेवर गंभीर आरोप केला. साठ वर्षीय महिला तिच्या लहान मुलीला एका बॅगमध्ये टाकून अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्या महिलेनं मोठा गोंधळ घातला. तिच्या या आरोपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
मराठी आणि हिंदी नीट बोलता येत नसल्यामुळे भोजपुरी भाषिक त्या वृद्ध महिलेला आपला बचाव करता आला नाही. आरोप करणाऱ्या महिलेनं संतापाच्या भरात त्या वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी घटनास्थळी जमलेल्या इतर लोकांनाही गैरसमज झाला आणि त्यांनीही त्या महिलेला मुलं चोरणाऱ्या टोळीतील सदस्य समजून मारहाण करण्यास प्रोत्साहन दिले.
पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून त्या वृद्ध महिलेची सुटका करून तिला सुरक्षितपणे पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केल्यानंतर तिच्या मुलाला आणि सुनेला बोलावण्यात आले. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि वृद्ध महिला निरपराध असल्याचे स्पष्ट झाले.
नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या खोट्या आणि तथ्यहीन अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. याच अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा गैरसमजांना खतपाणी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास स्वतः कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
