गुलामगिरीचे जोखंड गळ्यात घालून वावरतील काय?
राज ठाकरे ज्यावेळेस दिल्ली दरबारी गेले त्याच वेळेस ते भाजपसोबत किंवा मोदींना पाठिंबा देतील हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळलं होतं. पण वाघ एवढ्या लवकर गवत खायला, सुरुवात करेल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती आणि बिनशर्त पाठिंबा हा देत असताना “उद्या लाव रे व्हिडिओ म्हणण्यापेक्षा काढ रे व्हिडिओ, काढून टाक रे व्हिडिओ” म्हणायची पाळी राज ठाकरेंवर आली आहे. राज ठाकरे सारखा लढवय्या नेता मात्र गुलामगिरीचे जोखंड गळ्यात घालून वावरतील काय…? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वाघाची शेळी झाली आणि शेळी गवत खायला लागली अशी अवस्था भाजपमध्ये गेल्यावर राज ठाकरेंची होऊ नये, असे मराठी माणसांना वाटते. ज्यांच्या सभांनी विरोधकाचे धाबे दणाणले होते. मात्र, आता त्यांची सभा ही मोदींचे गुणगान गाण्यात जात असेल तर त्या सभेमध्ये काही राम नसेल.
राज ठाकरेंची कुठली तरी नस दाबली असावी…
वडेट्टीवार पुढे म्हणाले, राज ठाकरे यांच्या महायुतीत सामील झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांवर कोणताही परिणाम होणार नाही. कदाचित राज ठाकरे घाबरले असतील. मोदी सरकारने राज ठाकरेंची कुठले तरी नस दाबली असावी, ती दुखणारी आहे की दूध देणारी आहे हे येणाऱ्या काळात कळेल पण “कुछ ना कुछ दाल मे जरूर काला है “. यासाठीच आज राज ठाकरे सारखा नेता दिल्ली दरबारी पहिले वाकून आला, आता कमरेपासून झुकला आहे, हे मान्य होणारे नाही. त्यामुळे महाविकास आघाडीवर याच्या काही परिणाम होणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.