राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला प्रसार माध्यमांचा खास ठाकरे शैलीत समाचार घेतला. त्यानंतर आपण अमित शाह यांची का आणि कशासाठी भेट घेतली हे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र आले पाहिजे हे वारंवार सांगितल्यानंतर नेमक काय केले पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी अमित शहांना फोन करून त्यांची भेट मागितल्याचे सांगितले. या चर्चेतून जे काही समोर आले त्यातून हा निर्णय घेतला की, आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी देखील नको, असे सांगत राज यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला.
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी लोकसभेबाबतची भूमिका स्पष्ट करत असताना विधानसभेत जरी ते महायुतीसोबत केले तरी मनसेचे चिन्ह असलेल्या रेल्वे इंजिन बाबत कोणतीही तडजोड होणार नाही असे ठणकावून सांगितले. रेल्वे इंजिन हे चिन्ह मी,माझ्या सहकाऱ्यांनी कष्टाने कमावलेले आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरू राहणार. त्यामुळे कोणत्याही तर्क-वितर्कांवर विश्वास ठेवू नका, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्या या विधानाचा अर्थ हाच की, आता लोकसभेत महायुतीला भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी उद्या विधानसभेत मनसेचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. तर मनसेच्या चिन्हावरच लढेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी मनसे उमेदवार अन्य चिन्हावर लढतील हे कधीच शक्य होणार नाही, हे स्पष्ट केले. राज यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यापासून मनसेज लोकसभेत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले अशी चर्चा सुरू होती.