शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यासाठी राज्यातील मनसैनिकांनी गर्दी केली आहे. या सभेत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी महायुती, लोकसभा निवडणूक, निवडणुकीचा प्रचार, महाविकास आघाडी तसेच अमित शाहसोबत झालेली भेट या विषयांवर भाष्य केले आहे.राज ठाकरे म्हणाले, महापालिकेची जेवढी रुग्णालये आहेत, या रुग्णालयातील डॉक्टरांना सरकारने निवडणुकीच्या कामावर जुंपलं आहे. निवडणुकीच्या कामावर डॉक्टर मतदाराची नाडी मोडणार आहेत का? की नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. निवडणूक होणार हे निवडणूक आयोगाला माहित असतं. तर त्यावेळी एक पॅनल का उभं करत नाही? निवडणुकीच्या वेळेस शिक्षक, नर्स, डॉक्टर घ्यायचे हे कोणते उद्योग? असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलं. ज्या डॉक्टरांवर निवडणुकीची जबाबदारी टाकली त्यांनी तिथे जाऊ नये. तुम्हाला नोकरीवरुन कोण काढतं हे मी पाहतो, असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला.
माझा कॉंग्रेसोबत कधी संबंध आला नाही. त्यांच्यासोबत माझ्या भेटी होत्या. मात्र भाजपसोबत गाठी पडल्या. त्यामुळे तेव्हापासून माझे भाजपसोबत चांगले संबंध प्रस्थापित झालेत. मी गुजरात दौऱ्यावर गेलो असता नरेंद्र मोदींसोबत संबंध निर्माण झाले. त्यानंतर जेव्हा वेळ आली तेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत असं बोलणारा मी पहिला व्यक्ती होतो. ३७० कलम जेव्हा रद्द झालं तेव्हा मोदींचं अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं, असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. मात्र जिथे पटलं नाही तिथे मी टीका केली आहे. मात्र ती व्यक्तीगत टीका नव्हती. सध्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजप आणि मोदींवर जशी टीका करत आहेत, तशी माझी टीका नव्हती. मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, म्हणून मी विरोध नाही केला तर मला भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.