• Sat. Sep 21st, 2024

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात एकूण २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. पाच जिल्ह्यांत ९७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गावोगावी पाण्याची गरज लक्षात घेऊन १३७५ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पाणीसाठा शिल्लक आहे. इतर पाच जिल्ह्यांतील ६३७ गावे, १७८ वाड्यांत ९७९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४४३ टँकर, जालना ३२१, बीड १४४, लातूर ०८ आणि धाराशीव जिल्ह्यात ६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, १३७५ खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांद्वारे लोकांना पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. एप्रिलच्या मध्यात धरणांनी तळ गाठला आहे. मराठवाड्यातील मोठ्या ११ धरणांत २५.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांतील चार पूर्ण कोरडे असून २६ धरणे जोत्याखाली आहेत. मध्यम प्रकल्पात एकूण १०.५८ टक्के पाणीसाठा आहे. ७५० लघु प्रकल्पातील ११३ प्रकल्प कोरडे आहेत; तर २८६ धरणे जोत्याखाली आहेत. या सर्व प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत २२ टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांत १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत फक्त २०.५९ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाणीटंचाईची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणात १९ टक्के पाणी

जायकवाडी धरणात १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर चार जिल्हे पूर्ण अवलंबून आहेत. पिण्याचे पाणी, सिंचन आणि उद्योगासाठी जायकवाडीवर मोठा भाग अवलंबून आहे. येलदरी धरणात ३८ टक्के, सिद्धेश्वर ११, मांजरा ७, उर्ध्व पैनगंगा ४९, निम्न तेरणा ३, निम्न मनार ३०, विष्णुपुरी ३८, निम्न दुधना धरणात ०७ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. माजलगाव आणि सिना कोळेगाव धरण कोरडे आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे गावोगावी पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शिवाय, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

‘उजनी’ उणे ३७ टक्क्यांवर; ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांत पाणीपुरवठा योजना संकटात
मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. सुखना धरणात एक टक्के पाणीसाठा आहे. टेंभापुरी ११, वाकोद ०५, गिरजा ०५, गडदगड ३६, पूर्णा नेवपूर ०१, अंजना पळशी ०६, शिवना टाकळी ०८, खेळणा ३३, अजिंठा अंधारी २६ टक्के असा पाणीसाठी शिल्लक आहे. लाहुकी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव, अंबाडी या धरणांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील ९८ लघु प्रकल्पात ११.३६ टक्के पाणीसाठा आहे. तर ६१ लघु प्रकल्प पूर्णत: कोरडे आहेत. या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed