• Mon. Nov 25th, 2024

    पहिल्या टप्प्याचा प्रचारारंभ, पण जागावाटपाचं गणित सुटेना; मविआत सांगली, युतीत नाशिकवरुन धुसफूस

    पहिल्या टप्प्याचा प्रचारारंभ, पण जागावाटपाचं गणित सुटेना; मविआत सांगली, युतीत नाशिकवरुन धुसफूस

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला तरी महाविकास आघाडी आणि महायुतीत अजूनही काही जागांचा गुंता सुटत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीवरून तर महायुतीत नाशिकच्या जागेवरून जोर-बैठकाच सुरूच आहेत. सांगलीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस असे दोघेही दावा करीत असताना नाशिकमध्ये आता हेमंत गोडसे, छगन भुजबळ यांच्याऐवजी तीन नव्या नावांवर संघ परिवाराकडून चर्चा सुरू झाल्याचे कळते.

    महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कलगीतुरा रंगलेला असताना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी आपला ठाम दावा केला. ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या रूपाने आपला उमेदवार दिला आहे. विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेते समजावून सांगतील,’ असे म्हणत माघार घेणार नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

    आज पत्रकार परिषद

    सांगलीचा दौरा आटोपून सोमवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. लोकसभेचे जागावाटप, महाविकास आघाडीची निवडणुकीच्या अनुषंगाने असलेली रणनीती आम्ही आज, मंगळवारी जनतेसमोर पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट करू, असे राऊत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले; तसेच आपचे नेतेही असतील, असेही राऊतांनी सांगितले.

    ‘महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एखाद-दुसऱ्या जागेवरून हट्ट असू शकतो. परंतु प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा हट्ट दूर करणे अपेक्षित आहे. कोल्हापूर, रामटेक, अमरावतीत आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता; पण आम्ही पदाधिकाऱ्यांशी बोलून तेथील विषय सोडवला. आमच्या लोकांनी जाहीर विधाने केली नाहीत,’ असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.
    एकनाथ शिंदेंचा खासदार ‘कमळा’वर निवडणूक लढवणार? भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
    दरम्यान, सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील ठामच आहेत. मंगळवारच्या पत्रकार परिषदेत निर्णय आमच्या बाजूने होईल असा आम्हाला विश्वास असल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. गळवारी निर्णयाची गुढी उभारू, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
    मनसेच्या पाडवा मेळाव्यात गोड बातमी मिळेल? फडणवीस हसत म्हणाले, मनसेशी चर्चा झाल्यात पण…

    तीन नावांची चाचपणी

    नाशिकच्या जागेवरून महायुतीत गुंता वाढत चालला आहे. हेमंत गोडसे, भुजबळांऐवजी आता वेगळ्या पर्यायांचा विचार सुरू झाल्याचे समजते. भाजपकडून नवा सर्व्हे करून तीन नव्या नावांची संघ परिवाराकडून चाचपणी करण्यात येत असल्याचे समजते. त्यानुसार राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे, अजय बोरस्ते यांची नावे चर्चेत असल्याचे समजते.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    ‘मविआमध्ये फूट पडेल’

    मविआच्या पत्रकार परिषदेनंतर यांच्यात बंडखोरी होईल आणि मविआ तुटल्याची घोषणाही उद्याच होईल, असा अंदाज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी वर्तवला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *