रोहित पवार यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “मिस्टर प्रफुल्ल पटेलजी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती करतो की, अजितदादांच्या अपघाताला/ घातपातला कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याचा राजस्थानमध्ये जो विवाहसोहळा पार पडला तिथे आपण गेला होतात का आणि गेला असाल तर त्या लग्नात आणखी कोणते नेते उपस्थित होते. ते कोणत्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं,” असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या, उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा आहे, असं रोहित पवार यांनी शनिवारी रात्री लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अपघाताच्या तपासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा तपास अनेक यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. या यंत्रणांचा सविस्तर अहवाल आल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल,’ अशी भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी मांडली. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रा २०२५-२६’ या जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्य्रकमानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप केला जात आहे? या प्रश्नाला उत्तर देताना सुनेत्रा पवार बोलत होत्या.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ‘अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. आता प्राथमिक अहवाल आला आहे. तो काही संपूर्ण अहवाल नाही. अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. अनेक एजन्सी तपास करीत आहेत. त्यांचा तपास पूर्ण होऊन अंतिम अहवाल आल्यानंतर यावर बोलू शकतो. सध्या यावर बोलणे उचित होणार नाही.’
दरम्यान, राज्यसभेसाठी पार्थ पवार यांना संधी देण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, की राज्यसभा हे उच्च सभागृह आहे. अतिशय अनुभवी लोकांचे हे सभागृह आहे. तिथे जाताना जाणकार म्हणून अनेक गोष्टी आधी शिकून घेणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी शिकून घेऊन पार्थ पवार हे येथून पुढे चांगली कामगिरी करतील, असे आई म्हणून वाटते असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.