• Sat. Sep 21st, 2024

विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट, किती उमेदवार रिंगणात? कोणी घेतली माघार?

विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट, किती उमेदवार रिंगणात? कोणी घेतली माघार?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. विदर्भाच्या वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील ३० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ११४ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. या पाचही मतदारसंघात १८१ उमेदवारांनी २४२ अर्ज दाखल केले होते. छाननीत १४४ उमेदवार पात्र ठरले होते. दरम्यान, विदर्भातील दहा मतदारसंघांचा विचार करता एकूण २११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात २१ महिला उमेदवारांचा समावेश आहेत.

वर्धा लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. या मतदारसंघात छाननीअंती २६ उमेदवार वैध ठरले होते. शैलेश अग्रवाल व माधुरी अरुणराव डहारे या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या मतदारसंघात भाजपचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अमर काळे यांच्यात थेट लढत होणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात १९ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ३७ उमेदवार आहेत. यात तीन राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, प्रहारचे दिनेश बूब, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात ५९ उमेदवारांनी ७३ अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर ५६ उमेदवार पात्र ठरले होते.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात ३८ उमेदवारांनी ४९ अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर २० अर्ज पात्र ठरले होते. मात्र तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार कायम आहेत. या मतदारसंघात छाननीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा अर्ज बाद ठरला होता. त्यामुळे आता शिवसेनेच्या राजश्री पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. आज, मंगळवारी गुढीपाडव्याचे औचित्य साधून राजश्री पाटील तर संजय देशमुख पोहरादेवीतून आपल्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत.

विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?
भाजपचे विजयराज शिंदेंचे बंड शमले

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक मैदानात २१ उमेदवार उरले आहेत. भाजपचे विजयराज शिंदे यांनी महायुतीशी बंड करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश मिळाल्याने त्यांचे बंड थंड झाले. महाविकास आघाडीला न जुमानता बंडखोरी करत अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांचीदेखील समजूत काढण्यात आली. शिंदे, पाटलांसह पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटिकचे दीपक जाधव व अपक्ष नामदेव राठोड अशा चौघांनी माघार घेतल्याने निवडणुकीत सामना निश्चित झाला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी ४२ अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर २५ उमेदवार पात्र ठरले होते.

गव्हाणकरांची माघार

अकोला लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी बंडखोरी करीत अर्ज दाखल केला होता. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यावर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे धोत्रे, पाटील आणि आंबेकर यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या मतदारसंघात २८ उमेदवारांनी ४० अर्ज दाखल केले होते. छाननीत १७ उमेदवार पात्र ठरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed