‘लाल आतंक’ कुणाची देण होती, मागासवर्गाला कुणी दगा दिला, असे सवाल उपस्थित करीत पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसला सत्ता मिळाली की मलाई खातात. आपल्या सत्ताकाळात त्यांनी महाराष्ट्राची उपेक्षा केली. परिवाराचा विकास करताना देशाच्या विकासाला ब्रेक लावला. समृद्धी महामार्गाला विरोध केला. जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रो, कोकण रिफायनरी, आवास आणि बळीराजा संजीवनी योजना बंद केल्या. आम्ही विदर्भच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी योजना सुरू केल्या. दलित, मागास, आदिवासींना घरे दिली. पाणी, रस्ते आणि शिक्षणाची गॅरंटी दिली. त्यांचे जीवनमान बदलले. आजवर चार कोटी लोकांना घरे मिळाली आहेत. गरिबांना मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना राबविली. आपल्या मतदानाच्या ताकदीमुळे हा विकास घडून आला. या प्रत्येक पुण्यकार्याचे तुम्हीच निर्माते आहात, असेही मोदी म्हणाले. मनात सकारात्मक भाव असले की त्याचे परिणामही सकारात्मक येतात हे यातून दिसल्याचा विश्वास व्यक्त केला. मतदानाचे विक्रम मोडा, मतदान वाढवा, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.
‘कडू कारले तुपात तळले…’
‘माता महाकालीच्या पानवभूमीत शक्तीला नमन करतो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना नमन, चंद्रपूरकरांना नमस्कार,’ अशी मराठीतून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ‘कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच’ या म्हणीतून विरोधकांवर टीकाही केली. समस्त बंधूभगिनींना नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
दहा वर्षांत नक्षलवाद कमजोर
काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेबाहेर असल्याने देशातील मोठ्या समस्येचा कायमस्वरूपी उपचार करता आला. नक्षलवाद कमजोर झाला. गडचिरोलीची चर्चा विकास आणि ‘स्टील सिटी’ म्हणून होऊ लागली आहे. ‘पोलाद सिटी’ म्हणून गडचिरोली ओळखले जात आहे, असेही मोदी म्हणाले. इंडिया आघाडी दक्षिण भारताला वेगळे करण्याची भाषा बोलतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहचविते. नकली शिवसेनावाले महाराष्ट्रात रॅली काढतात, असा टोलाही मोदी यांनी मारला.