राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे संबंध चांगले मानले जातात. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर मोहितेही त्यांच्यासोबत गेले. तर, इकडे कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने दोन मित्र आता आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार असलेल्या कोल्हे यांना मोहिते यांनी पुतणीच्या लग्नात नुकतेच निमंत्रित केले होते. त्या वेळी कोल्हे यांनी लग्नाचा मुहूर्त साधून तुतारी वाजविण्याचे आवाहन केले होते. कोल्हे यांच्या या ‘टायमिंग’ला मोहिते यांनी दादही दिली होती. दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशाने आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून नाराज झालेले मोहिते अजूनही नाराज आहेत का, याबद्दल चर्चा घडत असतानाच मोहिते यांनी जुन्या मित्राला चहावरून खिजवल्यानंतर चहापुराण चवीने चघळले जाऊ लागले आहे. ‘मोहिते यांनी कांद्याच्या आणि दुधाच्या दरावर बोलावे,’ असा सल्ला कोल्हे यांनी दिला आहे.
महायुतीच्या नेत्यांच्या ह्रदयात संभाजीराजे नाहीत
बलिदान दिनानिमित्त वढू बुद्रुक येथे जाऊन डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. ‘वढू बुद्रुकचे स्मारक राष्ट्रीय स्मारक व्हावे, या उदयनराजेंच्या मागणीला माझे अनुमोदन आहे. समाधीस्थळाच्या भूमिपूजनासाठी महायुतीचे मिरवणारे नेते बलिदान दिनी नतमस्तक होण्यासाठी आले नाहीत. त्यांच्या हृदयात संभाजीराजे नाहीत. या नेत्यांना इथे नतमस्तक होण्यासाठी वेळ नाही,’ अशी टीका कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
राज्य सरकारने दुष्काळाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अजित पवार हे विकासावर बोलतात; पण पाणीटंचाईवर बैठक घेताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. ते जागावाटपासाठी दिल्लीच्या वाऱ्या करण्यात मग्न आहेत.- डॉ. अमोल कोल्हे