पिंपरी चिंचवड येथे महायुतीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत, उमेदवार श्रीरंग बारणे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
विरोधकांकडून अपप्रचार
यावेळी अजित पवार म्हणाले की, यंदाची निवडणूक ही विचारांची नाही तर विकासाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात काय केले असे आरोप नेहमी विरोधकांकडून केले जातात. काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना २८ वेळा घटना दुरुस्ती केली आहे. तर पंतप्रधान यांनी देखील आतापर्यंत सहा वेळा घटना दुरुस्ती केली आहे. घटना दुरुस्ती आणि घटना बदल हे समजून घ्या, असे सांगताना विरोधकांकडून घटना बदलण्याचा अपप्रचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
कुणी म्हणेल अजित पवारांनीच उभा राहायला सांगितले आहे पण…
यंदाच्या निवडणुकीत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणायचे आहे. ही निवडणूक ही विचारांची नसून विकासाची आहे. समोरचा विरोधी उमेदवार म्हणेल की मला अजित पवारांनी उभे राहायला सांगितले आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मी असले काही करत नाही. आपला महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे आहेत आणि त्यांनाच आपल्याला निवडून आणायचे असेही अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांची काँग्रेससच्या जाहीरनाम्यावर टीका
काँग्रेसने गरिब महिलांच्या खात्यात १ लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले आहे. भारतात १४० कोटींमध्ये ७० कोटी महिला आहेत. प्रत्येक महिलेच्या खात्यात १ लाख टाकायचे म्हटले तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली.