• Sun. Jun 7th, 2026

    Kolhapur Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद; उत्सवमूर्ती आणि कलशाचे दर्शन भाविकांसाठी खुले

    Kolhapur Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद; उत्सवमूर्ती आणि कलशाचे दर्शन भाविकांसाठी खुले

    Ambabai Mandir Darshan: 14 मार्च (शनिवार) ते 17 मार्च (मंगळवार) या कालावधीत देवीच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन या चार दिवसांमध्ये भाविकांना घेता येणार नाही.

    अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर: देशविदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास प्रकल्पांतर्गत जतन संवर्धनाचे काम गेल्या काही दिवसांपासून मंदिरात सुरु आहे. याच विकास प्रकल्पांतर्गत गाभाऱ्याच्या जतन आणि संवर्धन कामांसाठी शनिवार 14 मार्च ते 17 मार्च 2026 या कालावधीत अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना उत्सवमूर्ती तसेच प्राणप्रतिष्ठापित मंगल श्रीकलशाचे दर्शन घेता येणार आहे.

    मंदिर प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मंदिर प्रशासनाने भाविकांना गैरसोय होऊ नये, म्हणून उत्सवमूर्ती व श्रीकलश यांची प्रतिष्ठापना पितळी उंबऱ्याच्या बाहेरील बाजूला अर्थात मुक्ती मंडपात केली असून तेथून दर्शन आणि अभिषेक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

    गाभारा जतन आणि संवर्धनाची मोहीम
    मंदिर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर हे अंबाबाई देवीचे दर्शन बंद करण्यात आले आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही देवींच्या गर्भगृहांच्या अंतर्गत व बाह्य भागांचे जतन, सॅण्ड ब्लास्टिंग, वॉशिंग आणि दगडी फरशी‑भिंतीचे नूतनीकरण यासारखी कामे सुरू आहेत. या तंत्रज्ञानामुळे दगडी भिंतींना पडलेल्या भेगा आणि चिरा भरून घेऊन बांधकाम अधिक भक्कम करण्याचा हेतू आहे.

    दगडी फरशी आणि गाभारा आधुनिकीकरण
    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माहितीनुसार, 14 ते 17 मार्च या कालावधीत मुख्य पेटी चौकापासून गाभाऱ्यातील दगडी फरशीचे नूतनीकरण, दगडांची जोडणी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या बांधकामाची कामे केंद्रित रीतीने पार पडणार आहेत. यामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, सुबक आणि भाविकांना सुलभ असे बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    दर्शन पूर्ववत कसे होणार?
    मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, 17 मार्च (मंगळवार) देवीचे आगमोक्त आणि वेदोक्त धार्मिक विधी तसेच पूर्णाहुती झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमाराला साडेबाराच्या आरतीपासून श्री अंबाबाईचे मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांना,, या कालावधीत मंदिराच्या सुरक्षा गरजा आणि विकास कामांना सहकार्य आणि सहनशीलता दाखवावी, असे आवाहन केले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा