मुंबई : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात कलगीतुरा रंगलेला असताना खासदार संजय राऊत यांनी सांगलीचा निकाल लावलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या रुपाने उमेदवार दिलेला आहे. विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेते समजावून सांगतील, असे सांगत शिवसेना आता माघार घेणार नसल्याचेच राऊत यांनी स्पष्ट केले.सांगली लोकसभेतून काँग्रेसचे इच्छुक उमेद्वार विशाल पाटील यांनी काँग्रेसचा गड मोठ्या ताकदीने लढवायचाच नाही तर जिंकायचा असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराला लागले आहेत. दुसरीकडे सांगलीत ठाण मांडून संजय राऊत यांनी शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. सांगलीचा दौरा आटोपून सोमवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. लोकसभेचे जागावाटप, महाविकास आघाडीची निवडणुकीच्या अनुषंगाने असलेली रणनीती आदी विषयांवर आम्ही उद्या जनतेसमोर महाविकास आघाडीची भूमिका पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट करू, असे राऊत यांनी सांगितले. उद्याच्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले तसेच आपचे नेतेही असतील, असेही राऊतांनी सांगितले.
मैत्रीपूर्ण लढाईची भाषा कुणीही करू नये, खासदार संजय राऊतांनी सांगलीत येऊन ठणकावलेहट्ट असू शकतो पण तो दूर करणे नेत्यांचे काम
यावेळी संजय राऊत यांना सांगलीच्या जागेवरून पत्रकारांनी प्रश्न विचारले. तुम्ही सांगलीत दोन दिवस प्रचार केला परंतु काँग्रेस अजूनही सांगलीच्या जागेवर अडून बसली आहे. सांगलीचा तिढा कधी सुटेल? या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एखाद दुसऱ्या जागेवरून हट्ट असू शकतो. परंतु प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा हट्ट दूर करणे अपेक्षित आहे. कोल्हापूर, रामटेक, अमरावतील देखील आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता, पण आम्ही पदाधिकाऱ्यांशी बोलून तेथील विषय सोडवला. आमच्या लोकांनी जाहीर विधाने केली नाहीत” असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.
विशाल पाटील आमचेच, त्यांना विशाल पाटलांना संसदेत पाठवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार | संजय राऊत
सांगलीवरून कोणताही वाद नाही
विशाल पाटील म्हणतायेत की सांगलीत उद्या निर्णयाची गुढी उभारू, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाले, “विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आपण लढायला हवे ही प्रत्येकाची आशा अपेक्षा असते. त्यांच्या भावनांचा आदर करतो, पण सांगलीत मविआने उमेदवार जाहीर केलाय. दोन दिवस प्रचारात होतो. राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करू. काँग्रेसचे प्रमुख नेतेही स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि सांगलीचा अंतिम निर्णय घेतील”