माढासाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी संजीवराजे निंबाळकर व धैर्यशील मोहिते-पाटील यापैकी एकाच्या नावावर एकमत करण्याची संधी दिली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होण्यास अद्याप सहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सातारा व माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. अद्याप साताऱ्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची यापूर्वीच घोषणा केली आहे. आता त्याविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उभे केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला असल्याने माढ्यातून त्यांनी फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, तर अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यापैकी एकाला संधी देण्याचे निश्चित केले आहे.
उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तुतारीच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी नकार दिल्यास आमदार शशिकांत शिंदेंच्या नावावर पवार शिक्कामोर्तब करणार आहेत; पण त्यासाठी दोन्हीकडच्या नेत्यांना मुहूर्त हवा आहे. येत्या मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सातारा व माढातील राष्ट्रवादी व भाजपच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दुसरीकडे सातारा लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून कोणाचीही उमेदवारी घोषित झालेली नाही. महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तरीही भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मी लोकसभा लढणारच, असे ठणकावत प्रचारास सुरुवात केली आहे.