• Sun. Nov 24th, 2024
    एकनाथ खडसे हे फडणवीसांच्या हृदयात, भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे काय म्हणाले?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘एकनाथ खडसे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयात मानाचे स्थान असून, ते खडसेंच्या विरोधात नाहीत,’ असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला. ‘खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाच्या केंद्रीय समितीकडून निर्णय घेतला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

    भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरात आयोजित ‘घर चलो अभियाना’त बावनकुळे रविवारी सकाळी सहभागी झाले होते. या उपक्रमानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, ‘विकसित भारताच्या संकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करण्यात येत आहेत. भाजपमध्ये येण्याचे खडसे यांचे मत असेल, तर काहीच हरकत नाही. पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही. जे-जे पक्षामध्ये प्रवेश करतील त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग होत आहे.’

    महायुतीतील जागा वाटपावरून सुरू असलेल्या तिढ्याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जागा वाटपाबाबत महायुतीचे सर्व काही ठरले आहे. याबाबत ज्यावेळी बैठक होईल, तेव्हा अवघ्या अर्ध्या तासात निर्णय झालेला असेल. साताऱ्याच्या जागेबाबतही निर्णय झाला असून, तोही लवकरच जाहीर होईल. निवडणुकीचे जसे टप्पे आहेत तशी नावे निश्चित केली जात आहेत. राज्यात ४५ जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार असून, त्या दृष्टीने एकमताने उमेदवारांचा निर्णय होत आहे,’ असे बावनकुळे म्हणाले.

    खडसे आज-उद्या भाजपत जातील, त्यांच्यावर दडपण असू शकतं, रोहिणी खडसेंनी सुप्रिया सुळेंना काय सांगितलं?

    ‘काँग्रेस कायम आंबेडकरविरोधी राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्याचे पापही काँग्रेसनेच केले आहे. सध्याही राज्यात प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नये म्हणून काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे,’ आरोप बावनकुळे यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *