रामटेक लोकसभेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या मेळाव्याला संबोधित करताना शिंदे बोलत होते. यावेळी मंचावर आमदार ॲड. आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उमेदवार राजू पारवे, दीपक सावंत, सुरज गोजे, मनिषा कायंदे व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले, ‘आपल्या उमेदवारांसाठी मी लढत होतो हे कृपाल तुमाने यांनी स्वत:च सांगितले आहे. अखेरीस तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी घेतलेला निर्णय त्यांनी मान्य केला आणि राजू पारवेंसाठी ते कामही करीत आहेत. मात्र, मोठा भाऊ म्हणून मी शब्द देतो की तुमाने यांना खासदारकीपेक्षा मोठा सन्मान देईल.’
शिवसैनिक प्रेमाचा भुकेला
शिवसैनिक हा केवळ प्रेमाचा भुकेला आहे. त्याला इतर काहीही नको, त्याला केवळ प्रेम हवे आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीच्या भरवशावर आमदार, खासदार झाल्यावर त्यांच्या अडीअडचणींना त्यांच्या पाठिशी उभे रहा, असे आवाहन यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना केले.
मी डॉक्टर नसलो तरी एक मोठे ऑपरेशन केले
मेळाव्यापूर्वी शिंदे यांनी डॉक्टर व व्यावसायिकांची बैठक घेतली. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, ‘मी डॉक्टर नसलो तरी काही दिवसांपूर्वी एक मोठे ऑपरेशन केले. काहींच्या मानेचा, कंबरेचा पट्टा मी सोडविला.’
तुमानेंची खदखद बाहेर
माझ्याबद्दल काही जणांनी शिंदे साहेब यांना वाटेल ते सांगितले. तुमची संघटना नाही, तुमाने बाहेर फिरत नाही, ते घरातच बसतात, अशी खोटी माहिती दिली. या संघटनेच्या भरवशावर आम्ही मुकुल वासनिकसारख्या केंद्रीय नेतृत्वाचे पराभव केला, अशात हा उमेदवार तर काहीच नव्हता. मला उमेदवारी दिली असती तर मी गेल्यावेळेस पेक्षा अधिक मताधिक्क्याने निवडून आलो असतो, या शब्दांत कृपाल तुमाने यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. ‘आता मी पारवे यांच्यासाठी काम करणार असून त्यांना निवडून आणणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला नवी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले आहे. पुढील विधानसभेत पूर्व विदर्भातून शिवसेनेचे किमान १० आमदार असतील याची खात्री मी देतो,’ असे यावेळी तुमाने यांनी सांगितले.
विदर्भातील शेती कठीण
‘कोकणच्या मातीत शिवसेनेसाठी पोषक वातावरण आहे. तशी परिस्थिती विदर्भात नाही. तरीसुद्धा आम्ही संघटना जिवंत ठेवली आणि एक आमदार व एक खासदार निवडून आणला. आता मुख्यमंत्री विदर्भातील कोरडवाहू जमिनीत पाण्याची व्यवस्था करतील व संघटना बळकट करतील यावर आम्हाला विश्वास असल्याचे मत यावळी आमदार जयस्वाल यांनी व्यक्त केले.