नाशिकची जागा पारंपरिक शिवसेनेची असून, ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल, असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजेंची उमेदवारी जाहीर झाली असली तरी, महायुतीचा उमेदवार कोण हे ठरलेले नाही. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटणार, असे बोलले जात आहे.
भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, ‘नाशिकमधून हेमंत गोडसेच लढणार’ असे चौधरी म्हणाले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून भुजबळ उमेदवारी मागत असतील. पण, हेमंत गोडसे यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांचा पराभव केला आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली तशी नाशिकमधून गोडसे यांचीही उमेदवारी एक-दोन दिवसांत जाहीर होईल. आधीपेक्षा यंदा गोडसे यांचे मताधिक्य वाढलेले असेल, असा दावाही चौधरी यांनी केला.
‘जखमेवर मीठ नको’
मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन मराठा समाजाला डिवचण्याचे किंवा जखमेवर मीठ चोळण्याचे काम महायुतीने करू नये. भुजबळांना उमेदवारी देऊ नका. अन्यथा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी नाशिकमधून दिला. महायुतीने भुजबळांना उमेदवारी देऊन स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेऊ नये, असे आवाहन गायकर यांनी केले. ‘आम्ही पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या उमेदवारीला विरोध केलेला नाही. परंतु, मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या भुजबळांना आमचा विरोध आहे. महायुतीमधील शिवसेनेसारखे घटकपक्षही त्यांना स्वीकारायला तयार नाहीत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भुजबळ दोन अडीच लाखांच्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे ते यंदा निवडून येतील असा जावईशोध महायुतीमधील कोणी लावला हे शोधायला हवे. भुजबळ स्वत: इच्छुक नसताना त्यांना घोड्यावर का बसविले जात आहे, असा सवालही गायकर यांनी उपस्थित केला.