• Sat. Sep 21st, 2024

तोफा धडाडू लागल्या, विविध नेत्यांच्या आपापल्या उमेदवारांसाठी नागपुरात सभा

तोफा धडाडू लागल्या, विविध नेत्यांच्या आपापल्या उमेदवारांसाठी नागपुरात सभा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोन आठवड्याहून कमी काळ असल्याने नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या. प्रचाराला अचानक वेग आला. नेत्यांच्या मांदियाळीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. उन्हासोबतच राजकीय वातावरण तापायला लागले.

पदयात्रा, मिरवणूक आणि सभांनी निवडणुकीचा माहोल तयार होऊ लागला आहे. नागपूर-विदर्भातील प्रचंड उन्हाचे चटके सुरू झाले. मात्र, याची पर्वा न करता नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारात भिडले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. यापूर्वी गाजलेल्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाचा नेत्यांना विसर पडला आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबाबत आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांचा चांगलाच समाचार घेतला. समाजमाध्यमांवरूनही भाजपने काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. यातून १०-१२ दिवसांत पारा वाढवण्याऐवजी नेत्यांचा पारा चढण्याचे संकेत मिळाले आहेत.

गुढीपाडवा, रमजान ईद, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रामनवमीची बहुतांश पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. सणांच्या या दिवसात अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचायचे, यावर भर देण्यात आला आहे. भाजप समर्थकांकडून गुढीपाडव्याला विविध मंदिरांमधून हिंदुत्वाचा जागर करणारी रॅली काढण्यात येणार आहे. रामनवमीनिमित्त शहरातील सुमारे ४०० मंदिरांत पूजन व महाप्रसाद आयोजित केला आहे.

चेन्नीथला आज येणार

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या पूर्व विदर्भात तर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरात विकास ठाकरे यांच्यासाठी सभा झाल्या. चेन्नीथला आज, शनिवारी नागपुरात ठाकरे यांच्या प्रचारयात्रेत सहभागी होणार आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी १४ एप्रिल रोजी यावे, यासाठी स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न चालले आहेत.
पवार, पटेलांवर कारवाई का नाही? आरमोरीतील सभेत कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
मुख्यमंत्री घेणार मेळावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पूर्व विदर्भात येत आहेत. येत्या रविवारी ग्रामीणमधील शिवसैनिकांचा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. नितीन गडकरी यांच्या प्रचारात व नंतर पंतप्रधानांच्या सभेत ते सहभागी होणार आहेत. शिवसेनेकडून अभिनेते गोविंदा यांनी रामटेकमध्ये राजू पारवे यांच्यासाठी रोड शो केला.

मायावतींच्या सभेची तयारी

बसपच्या प्रमुख मायावती यांची विदर्भातील उमेदवारांसाठी येत्या ११ एप्रिल रोजी सभा होणार आहे. रामटेकचे संदीप मेश्राम व नागपुरातील योगिराज लांजेवार यांच्यासह अनेक उमेदवरांचे कार्यकर्ते सभेची जय्यत तयारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed