• Sun. Nov 24th, 2024
    सोशल मीडियावर ओळख वाढवत, नफ्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून गंडा, पाऊण कोटीचे शेअर्स फसले!

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नाशिकमधील काही जणांना पुन्हा एकदा फसविल्याचा प्रकार उघड झाला. सोशल मीडियावर ओळख वाढवून संशयितांनी नाशिकच्या काही व्यक्तींकडून ७६ लाख रुपये घेतले. त्याबदल्यात कोणताही मोबदला न दिल्याने सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जुना गंगापूर नाका येथील रहिवाशी राजेश धरमदास सचदेव यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. सचदेव यांच्यासह इतरही चार-पाच जणांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे. त्यांच्याशी डिसेंबर २०२३ मध्ये संशयितांनी संपर्क साधला. एक अॅप डाउनलोड करण्यास सांगून शेअर बाजाराच्या गुंतवणुकीची माहिती दिली. कमी कालावधीत शेअर्सच्या गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवले. त्यानंतर मोबाइल क्रमांकासह बँक खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत फिर्यांदीसह इतरांचे ७६ लाखांपेक्षा जास्त पैसे शेअर्समध्ये अडकले. त्यानंतर संशयितांशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी सायबर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख तपास करीत आहेत.

    पावणे दोन लाखांची चोरी

    नाशिक : एका व्यायामशाळेच्या चेजिंग रुममधून चोरट्यांनी बॅग चोरल्याचा प्रकार सातपूर परिसरातील शिवाजीनगरात घडला. या बॅगेत सोन्याची अंगठी, महागडा मोबाइल आणि काही रक्कम, असा एक लाख ७० हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed