म. टा. प्रतिनिधी, पुणे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांवर पोचल्याने राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. येत्या सात ते नऊ एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान कोरडे असल्याने शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांवर नोंदले गेले. सोलापूर येथे राज्यात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानाची ही स्थिती आणखी एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सात ते नऊ एप्रिल दरम्यान विजांसह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली आहे.
राज्यातील शहरांतील कमाल तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
सोलापूर ४३.१, चंद्रपूर ४२.४, वर्धा ४२.१, ब्रह्मपुरी ४२, यवतमाळ ४२, अकोला ४१.८, बीड ४१.५, परभणी ४१.४, नागपूर ४१.४, सांगली ४१, मालेगाव ४०.८, अमरावती ४०.६, धाराशीव ४०.६, गोंदिया ४०.३, कोल्हापूर ४०.२