‘लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे तसेच नाराजीनाट्य सुरू आहे. त्यात यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांची, तर हिंगोलीमधून हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांचाच सोबती आहे’, असा दावा अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ‘भाजपच्या तालावरच शिवसेनेला नाचावे लागत आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ताटाखालचे मांजर बनवले आहे’.
महायुतीला यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये उमेदवार बदलावा लागला आहे. या दोघांच्या बोलण्याला काही महत्त्व नाही, भाजप जे म्हणेल तेच त्यांना करावे लागते. एखाद्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाने ठरवावा, असे कधीच राज्यात झालेले नाही. जेव्हा शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करत असताना आमचे उमेदवार बदलण्याची किंवा हा तुमचा उमेदवार असावा, असे सांगण्याची भाजपची कधीच हिंमत झाली नाही. जागावाटप हे पक्षाचे होत असते, त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशाप्रकारची भूमिका असते, मात्र आता भाजपने ही नवीनच नीती अवलंबली आहे’, अशी टीका त्यांनी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही जागा अजून निश्चित झालेल्या नाहीत. त्याविषयी दानवे यांना विचारले असता, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जवळपास सर्व जागा निश्चित झाल्या आहेत. २१ उमेदवार जाहीर झालेले आहेत. मुंबईतील काही विषय बाकी आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
काँग्रेस लढणार नसेल, तर शिवसेना (उबाठा) या जागा लढवणार, अशाप्रकारची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. अशावेळी महायुतीत मात्र अजून घोळच सुरू आहे. त्यांचे उमेदवार बदलण्याचे काम चालू आहे, याला जागा द्यायची की त्याला, हेच अजून सुरूच आहे’, असेही दानवे म्हणाले.