राजकारण नाही, संविधानाप्रती निष्ठा ठेवा
सरन्यायाधीश म्हणाले, ‘ॲरिस्टॉटलने सांगितल्यानुसार, मनुष्य हा राजकीय प्राणी आहे. वकीलही त्याला अपवाद नाहीत. मात्र, तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आहात, याची जाणीव ठेवा. वकील संघटनांचे घटक म्हणून तुमची पहिली निष्ठा ही राजकीय पक्षाप्रती नाही तर न्यायालय व संविधानाप्रती असायला हवी. वकील संघटना या न्यायालय व समान्यांमधी दुवा म्हणून काम करू शकतात. तुम्ही विविध कार्यक्रम, भाषणे या माध्यमातून संविधान व न्यायालयाची क्लिष्ट विधीविषयक प्रक्रिया जनसामान्यांना सोप्या शब्दांत समजावून सांगू शकता.’
‘चंद्रचूड, बोबडे न्यायमूर्ती झाले नसते’
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व माजी सरन्यायाधीश शरद बोबडे या दोघांची एकाच वेळेस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, या नियुक्तीला बराच कालावधी लागला होता. अखेर या दोघांनी एकत्रितपणे आपले न्यायमूर्ती बनण्यासाठीचे संमतीपत्र परत घेतले होते. आता आपण न्यायमूर्ती होणार नाही, असे त्यांना वाटल्याने तेव्हापासून ते दोघे एकमेकांना गमतीने ‘मायलॉर्ड’ म्हणू लागले. मात्र, काळाच्या ओघात ते दोघेही सरन्यायाधीश झाले, असा किस्सा यावेळी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितला.
महिलांनी निवडणुका लढाव्यात!
आपल्या देशात सुरुवातीला महिलांना वकिली करण्याचीही संमती नव्हती. पुढे ती मिळाली आणि आज देशात मोठ्या प्रमाणात उत्तम महिला वकील उदयास आल्यात. मात्र, आजही वकील संघटनांच्या महत्त्वाच्या पदांच्या निवडणुकांमध्ये पुरुषांमध्येच लढत होताना दिसून येते. त्यामुळे महिलांनी समोर यावे, व महत्त्वाच्या पदांसाठी लढावे, असे मत यावेळी सरन्यायाधीशांनी व्यक्त केले.
‘विदर्भाची चळवळ फार जुनी’
विदर्भासाठीची चळवळ फार जुनी आहे. सुरुवातीला नागपूर आणि आसपासचे जिल्हे विदर्भात नव्हतेच. फार पूर्वी यवतमाळ, अमरावती, बुलढाणा व वर्धा हे जिल्हे निझामाच्या अखत्यारीत येत असत. त्यामुळे अडचण निर्माण होईल अशी भावना स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात निर्माण होऊ लागली व त्यातून विदर्भाची संकल्पना व मागणी उदयास आली, अशी माहिती यावेळी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिली.