लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करून महायुतीने आघाडी घेतली. परंतु, महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर हजारखोली भागातील संपर्क कार्यालय आवारात शेख यांनी नुकतीच पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आपली भूमिका मांडत दावेदारी कायम ठेवल्याने मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याविषयी चर्चा रंगली आहे. ‘मविआ’मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मात्र, येथून काँग्रेस दोनवेळा पराभूत झाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे द्यावा व आसिफ शेख यांना उमेदवारी द्यावी, असा ठराव आधीच पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे पाठविल्याचाही शेख यांनी पुनरुच्चार केला. शेख म्हणाले, की शहर व तालुक्यात काँग्रेसची स्थिती सर्वश्रुत आहे. काँग्रेसने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघात भाजपविरुद्ध नाराजी आहे. विद्यमान खासदारांनी मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात लक्ष दिलेले नाही. त्यांच्याविरुद्ध मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.
‘…तर आघाडीचा धर्म पाळू ’
काँग्रेसने उमेदवार दिल्यास आम्ही आघाडीचा धर्म पाळू. काँग्रेसने उमेदवार जाहीर करताना व प्रचारात आम्हाला विश्वासात घ्यावे. ज्या प्रभागात आमचे आजी-माजी नगरसेवक आहेत, तेथे व तालुक्यात प्रभाव असलेल्या क्षेत्रात प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावी. पक्ष कार्यकर्ते जोमाने काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी झटतील, असा आशावादही शेख यांनी व्यक्त केला