जिल्हा बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेत सहभागी जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीत असल्याने प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांनी काही कठोर पावले उचलली आहेत. मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यातून कोट्यवधींचे थकीत कर्ज असलेल्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड’ या साखर कारखान्याकडेही ५१ कोटी ६६ लाखांची थकबाकी आहे. कारखान्याचे संचालक मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना बँक प्रशासनाने नोटीस बजावली होती. तसेच बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या स्थळावर जाऊन जप्तीची नोटीस बजावली होती. त्यानंतर भुजबळ कुटुंबाने जिल्हा बँकेकडून सुरू असलेल्या ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेत थकबाकी भरणासाठी अर्ज केला होता. नाशिक लोकसभा मतदरासंघासाठी भुजबळ यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे निवडणूक लढवताना या थकबाकीबाबत कोणी तक्रार केली, तर अर्ज बाद होण्याचा धोका निर्माण होऊ नये, म्हणून भुजबळ कुटुंबीयांनी खबरदारी म्हणून पहिल्या टप्प्यात साडेसहा कोटींची रक्कम भरली आहे. उर्वरित रक्कम मासिक हफ्त्याने भरली जाणार आहे.
…हे आहे कर्जप्रकरण
भुजबळ कुटुंबीयांनी दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना विकत घेतला आहे. याच ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ (गिसाका) या साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडे १० नोव्हेंबर २०११ रोजी ३० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. यानंतर बँकेने ३ जानेवारी २०१२ ला कर्ज मंजूर केले. कारखान्याने ३० कोटींपैकी १८ कोटींची नियमित परतफेड केली. मात्र सन २०१३ पासून कारखान्याकडे १२ कोटी १२ लाख थकीत मुद्दल आणि व्याज ३९ कोटी ५४ लाख, असे एकूण ५१ कोटी ६६ लाख रुपये थकीत आहेत. त्यानंतर आता ‘वन टाइम सेटलमेंट’ योजनेत अर्ज केल्यानंतर ही रक्कम २८ कोटींवर आली असून, त्यापैकी साडेसहा कोटी भुजबळांनी एकरकमी भरले आहेत. उर्वरित रक्कम नऊ हफ्त्याने जिल्हा बँकेच्या खात्यात जमा होणार आहे.