उदय सामंत दोन दिवसांपासून नागपूर-रामटेकच्या दौऱ्यावर असून त्यांनी मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी पत्रपरिषदेत बोलताना सामंत म्हणाले, ‘बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द होणार, याची जाणीव असताना रश्मी बर्वे यांना मुद्दाम उमेदवारी देऊन त्याचे खापर सरकारवर फोडले. त्यांच्या पर्यायासाठी एबी फॉर्म तातडीने आला. तो कुणाकडे, कोणत्या आमदाराकडे होता, याची सर्वांना कल्पना आहे. उमेदवार व महायुती बदनाम कशी होईल, यासाठी गैरसमज पसरवले जात आहेत.’
अमरावतीत भाजप महायुतीच्या नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद असताना त्यांना उमेदवारी दिली, याकडे लक्ष वेधले असता, ‘त्यांचे प्रमाणपत्र रद्द झालेले नाही व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व स्पष्ट होईल, असे उदय सामंत म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
पत्रपरिषद संपल्यानंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार, मल्लिकार्जुन रेड्डी यांचे आगमन झाले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, प्रवक्ता मनीषा कायंदे, किरण पांडव, दिवाकर पाटणे, चंद्रहास राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बाबा गुजर, सतीश शिंदे, पीरिपाचे जयदीप कवाडे आदी उपस्थित होते.
तुमानेंना न्याय
रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आल्यानंतरही पत्ता साफ झालेले कृपाल तुमाने यांच्याबाबत विचारले असता, ‘ते आमचे मार्गदर्शक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मित्र आहेत. भविष्यात त्यांच्याकडे जबाबदारी येईल’, असे उदय सामंत म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गवर दावा कायम
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर आजही आमचा दावा कायम आहे व अखेरपर्यंत राहील, असे सांगून उदय सामंत यांनी रस्सीखेच सुरू असल्याचे अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे लढण्यास इच्छुक असल्याबाबत विचारले असता, ‘ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल काही बोलणे नैतिकतेत बसत नाही. प्रत्येक पक्ष व इच्छुकाला दावा करण्याचा अधिकार आहे’, असे सामंत म्हणाले.