• Mon. Nov 25th, 2024

    प्रचाराला काँग्रेसची दांडी, लंकेंनी तातडीने संगमनेर गाठलं, थोरात-काळेंशी चर्चेनंतर नाराजी दूर!

    प्रचाराला काँग्रेसची दांडी, लंकेंनी तातडीने संगमनेर गाठलं, थोरात-काळेंशी चर्चेनंतर नाराजी दूर!

    अहमदनगर : राज्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील मतभेदाची उदाहरणे ठिकठिकाणी पहायला मिळत असताना अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्याबाबतीतही काँग्रेसची नाराजी पहायला मिळाली. प्रचाराच्या प्रारंभाच्यावेळीच काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते भरसभेतून उठून गेले. शेवटी लंके यांनी स्वत: धावपळ करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी रात्री बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर नाराजी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारीसाठी भाजपमध्ये स्पर्धा लागली होती. त्यानंतर विखे पाटील यांनाच संधी मिळाल्याने आमदार राम शिंदे, भानुदास बेरड यांच्यासह काही जण नाराज असल्याचे चित्र होते. वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालून ही नाराजी दूर केली. त्यानंतर विखे पाटील यांचा सर्वांनी प्रचारही सुरू केला आहे.
    राजकारण: कधीकाळी पवारांचा बालेकिल्ला, आता विजयासाठी संघर्ष; अहमदनगर लोकसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत

    त्यानंतर महाविकास आघाडीकडून लंके यांना उमेदवारी जाहीर झाली. विशेष म्हणजे उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत एवढी स्पर्धा नव्हती. मात्र, लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नगर शहरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी पहायला मिळाली. या मतदारसंघातून थोरात यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी शहरातील पदाधिकाऱ्यांनी पूर्वी केली होती. उमेदवारी जाहीर झाल्यावर लंके यांनी थोरात यांची भेट घेतली. त्यानंतर प्रचाराच्या प्रारंभासाठी पाथर्डीत आयोजित केलेल्या सभेसाठी थोरात यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, थोरात आले नाहीत. तर दुसरीकडे सभेसाठी गेलेले शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याह त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते भरसभेतून निघून आले. त्यामुळे ही मंडळी नाराज झाल्याची बातमी पसरली.
    विरोधकांच्या तुलनेत निलेश लंके लहान कार्यकर्ता पण गुणी, निवडणुकीत नक्की यश मिळेल : बाळासाहेब थोरात

    दिवसभराचे कार्यक्रम संपल्यानंतर लंके यांनी रात्रीच नगरला येऊन या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सोमवारी रात्री उशिरा निलेश लंके आणि किरण काळे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर लंके, काळे यांनी शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी एकत्रित संवाद साधला. यामुळे आता काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला आहे. मात्र, नाराजीचे नेमके कारण काय होते, ती कशी दूर करण्यात आली? याचा तपशील समजू शकला नाही.

    जनतेनं हातात घेतलेली निवडणूक, विखे पाटलांना जनताच उत्तर देईल | निलेश लंके

    आतापर्यंत शहर काँग्रेस लंके यांच्या प्रचारापासून दूर असल्याचे पाहायला मिळत होते. सोमवारी रात्रीच्या भेटीनंतर सूत्रे वेगाने फिरली. आता काँग्रेसने बुधवारी सायंकाळी सात वाजता काळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराच्या नियोजनासाठी बैठक बोलाविली आहे. काळे यांनी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात सातत्याने भूमिका घेतली आहे. आता जगताप महायुतीमध्ये असल्याने यांची यंत्रणा डॉ. विखे पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाली आहे. तर आता लंके यांच्याकडून नाराजी दूर झाल्याने काळे यांची यंत्रणा लंके यांच्या प्रचारात सक्रीय होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *