राज्यातील धरणांबाबत सोमवारी जलसंपदा विभागाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्यातील जलसाठ्याबाबत सविस्तर अहवाल देण्यात आला. यावेळी राज्यातील धरणांमधील जलसाठा आणि टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, राज्यात सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामांसह सिंचनाच्या कामांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आल्याचे कळते.
मराठवाडा आणि इतर परिसरातील जलसाठा लक्षात घेता जायकवाडी धरणासाठी पाणी आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जायकवाडी धरणात १९ टक्के जिवंत जलसाठा असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी हा आकडा सुमारे ४५ टक्क्यांच्या घरात होता. या आकडेवारीतून राज्यातील तीव्र पाणीटंचाई समोर येत आहे.
चाराटंचाई उद्भवणार नाही
राज्यात सध्या २७ लाख ७१ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यामुळे येत्या काळात चारा छावणी लावण्याची बहुतांश ठिकाणी गरज भासणार नसल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली. साधारणपणे जूनपर्यंत हा साठा वापरता येऊ शकतो, असेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राज्यातील धरणांत केवळ ३७ टक्के जलसाठा
जलसंपदा विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या यादीनुसार, राज्यातील २९९४ धरणांमध्ये एकूण ३७.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा आकडा ४५.५२ टक्के इतका होती. यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून या ठिकाणी प्रमुख धरणांमध्ये २१.२८ टक्के, मध्यम प्रकल्पातील धरणांमध्ये १८.६२ टक्के, लघु प्रकल्पातील धरणांमध्ये १४.७८ टक्के, राज्य प्रकल्पांमध्ये १९.३६ टक्के इतका जलसाठा असल्याचे दिसून आले आहे.
दोन हजारांहून अधिक वाड्यांमध्ये टँकर
राज्यात जवळपास १ हजार ५२२ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. यात ७२ शासकीय आणि १,४५० खासगी टँकरचा समावेश आहे. या अहवालानुसार, राज्यातील दोन हजार ७७५ वाड्यांमध्ये, तर १,२३३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पाणी आरक्षण म्हणजे काय?
– पाणी आरक्षण लागू झाल्यानंतर संबंधित धरण किंवा तलावातील पाणी प्राधान्याने फक्त नागरिकांच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येते.
– त्यानंतर शेतीसाठी आणि त्यापाठोपाठ उद्योगधंद्यांना पाणी वापरण्याची मुभा देण्यात येते.
– यानुसार संबंधित जलसाठ्यातील पाणी पिण्यासाठी अधिक प्रमाणात वापरण्यात येते.
– काही ठिकाणी इतर कामांसाठी या पाण्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात येते.