• Sat. Sep 21st, 2024
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता कोणताही बदल होणार नाही : धैर्यशील माने

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि मराठवाडा मधील एका लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट काल पत्रकारांशी बोलताना केला आहे. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र उमेदवार बदलण्याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहेत. उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही आणि संभ्रम निर्माण करायची वेळ आता राहिलेली नाही. असं स्पष्टीकरण खासदार धैर्यशील माने यांनी दिलं आहे. ते आज कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.लोकसभा निवडणुकीत चर्चा या चर्चा असतात त्यामध्ये काही अर्थ नसतो. अशा चर्चा माझ्या उमेदवारीच्या आधीही सुरू होत्या. माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. म्हणून तर ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत मी गेलो आहे. कोणत्याही लोकसभा उमेदवाराचं नाव आमदार शिरसाठ यांनी घेतलेलं नाही, उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही संभ्रम निर्माण करायची वेळ आता राहिलेली नाही. असे म्हणत आमदार शिरसाठ यांना फटकारले आहे. तसेच काल १ एप्रिल होतं. एप्रिल फूल म्हणून कार्यकर्त्यांनी विसरून जावं, असं आवाहन धैर्यशील माने यांनी यावेळी म्हटलं आहे.
भाजपला मोठा धक्का, विद्यमान खासदार मुंबईत राऊतांच्या भेटीला, शिवबंधन बांधण्याच्या चर्चा

हातकणंगलेतून स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अद्याप पक्ष आणि दिशा सापडेना. त्यांची ससेहोलपट होत असून वैचारिक घालमेल आहे. नेमकं त्यांना काय करायचं हे सुचत नाही. एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई-वडील नको अशी परिस्थिती शेट्टींची झाली आहे. एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही पक्षांचा स्पर्श देखील नको. एकदा एकला चलो रे म्हणतात, तर एकदा पुढे जातात. तर एकदा तुमचं चिन्ह घ्यायला तयार आहे असे हे म्हणतात. तर एकदा मी माझ्या ताकदीवर पुढे जात आहे, असे वेगवेगळे स्टेटमेंट ते करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आमचं व्हिजन क्लिअर आहे. कोणाला वाईट म्हणून आम्ही मतं मागत नाही. स्वतःकडे स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंबासाठी ते पायऱ्या का झिजवत आहेत? असा सवाल ही खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित केला. स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायचे नसेल तर कोणाशी चर्चा करायचा संबंध येत नाही. त्यांनी त्यांचा मार्ग आधीच स्वीकारला आहे. मी कसा निवडून येईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शेट्टी हे स्वतः पूरतं राजकारण करतात. त्यांच्या संघटनेचे नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही त्यासाठी स्वाभिमानाने राहावं लागतं. राजू शेट्टी एका भूमिकेशी कधीही ठाम राहिले नाहीत. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हे मतदार संघातील प्रत्येक मतदाराने पाहिले असल्याचा घणाघात खासदार धैर्यशील माने यांनी शेट्टींवर केला.

माझी उमेदवारी जाहीर झाली तशी मी मयूर उद्योग समूहाचे प्रमुख संजय पाटील यांना संपर्क केला होता, ते मुंबईला होते. भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी आमच्या सुरू आहेत. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर मी ते दूर करेन. भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचे मला कुठेही जाणवले नाही. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची टीम आमच्याबरोबर काम करत आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवडे यांच्यासह कुटुंबीयांची लवकरच भेट घेणार असल्याचे खासदार माने यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed