दिलीप माने २०१९ साली शिवसेनेत गेले होते
दिलीप माने यांनी २८ ऑगस्ट २०१९ रोजी काँग्रेसला रामराम ठोकला होता आणि तानाजी सावंत यांच्या संपर्कात जाऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभेची २०१९ ची निवडणूक त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाऐवजी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढवली होती. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेच्या तिकिटावर लढत दिली होती. मात्र, शिवसेनेचे महेश कोठे यांनीही अपक्ष म्हणून याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मतविभागणीचा फायदा प्रणिती शिंदे यांना झाला होता. शिवसेनेचे कोठे आणि माने या दोघांचाही सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पराभव झाला. पराभव झाल्यापासून दिलीप माने शिवसेनेपासून अंतर राखून होते.
काँग्रेस सोडली नसती तर माने दक्षिण सोलापूरचे आमदार झाले असते
दिलीप माने शिवसेनेत गेल्याने २०१९ साली दक्षिण सोलापुरात विधानसभेसाठी काँग्रेसकडे तगडा उमेदवार नव्हता. शेवटी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला उमेदवारी देण्यात आली होती. या नवख्या उमेदवाराने भाजपच्या सुभाष देशमुखांना कडवी टक्कर दिली होती. जर दिलीप माने शिवसेनेत न जाता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवली असती तर नक्कीच भाजपच्या सुभाष देशमुखांना पराभूत केले असते, असे मत अनेकदा राजकीय तज्ञ्ज व्यक्त करतात.
दोन महिन्यांपूर्वी अजित पवार मानेंच्या फॉर्म हाऊसवर डिनरसाठी आले होते
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेले होते. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची आजही घट्ट मैत्री आहे. ३ फेब्रुवारी रोजी अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दिवसभर भेटीगाठी घेत रात्री अजित पवार यांनी दिलीप मानेंच्या बेलाटी येथील फॉर्म हाऊसवर जाऊन रात्री डिनर केले होते. यामुळे दिलीप माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील की काय असे चित्र निर्माण झाले होते. महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मुंबईत दिलीप माने यांनी काँग्रेसचा ‘हात’ हाती घेतला.