राजस्थान स्थापना दिनाच्या निमित्ताने ठाण्यातील वर्तकनगर येथे राजस्थान विकास मंच, ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित “एक शाम राजस्थान स्थापना दिवस के नाम’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्याशी हस्तांदोलन करीत हितगुज केले. मुख्यमंत्री शिंदे आणि डॉ. संजीव नाईक यांच्यातील या भेटीमुळे, ठाणे लोकसभेसाठी महायुतीचा ‘ठाणेदार’ ठरल्याची चर्चा आहे. डॉ.नाईक यांच्याबाबत मुख्यमंत्रीही अनुकुल असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, याविषयी शिवसेना तसेच भाजपकडून अद्याप कुणीही अधिकृत भाष्य केले नसले तरी, उभय पक्षाकडून तसेच राष्ट्रवादी (अजितदादा गट) कडूनही डॉ. संजीव नाईक यांनाच कौल असल्याचे सुचित केले जात आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली. तसेच दिवंगत आनंद दिघे हे नेहमीच व्यापाऱ्यांना सुरक्षा कवच देणारे आमचे नेते होते, असे उद्गार काढले. तीच परंपरा ठाण्यात नाहीतर अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे, असे ते म्हणाले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी राजस्थान झालेल्या निवडणुकीत आपण प्रचारासाठी गेलो होतो, त्या पाच ठिकाणचे उमेदवार जिंकून आल्याचेही यावेळी सांगितले. याशिवाय राजस्थानमधील एका आमदाराने शिवसेना पक्षामध्ये नुकताच जाहीर पक्षप्रवेश केल्याचे यावेळी सांगितले. तर या कार्यक्रमाला महिलांची संख्या जास्त दिसत आहे. त्याला कारणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आरक्षण आहे, असे ते म्हणाले. याशिवाय महाराष्ट्र राज्याने नेहमीच महिलांचा सन्मान केल्याचे ते म्हणाले.
