मुंबई : मुंबईसह राज्यातील दृष्टिहीन मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे एक अभिनव प्रयोग राबवण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत, राज्यातील दृष्टिहीन मतदारांना मतदार नोंदणीपासून ते मतदानापर्यंतची सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात देण्याचा विचार आयोगातर्फे सुरू आहे. ‘वोटर इन्फो ब्रोशर’असे या ऑडिओ माहितीपुस्तकाचे नाव असून यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक मुख्य अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. राज्यातील दृष्टिहीन मतदारांसाठी यंदाही मतदानकेंद्रांवर ब्रेल लिपीमध्ये उमेदवारांची माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली असून या मतदारसंघांतील उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकारी एच. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. राज्यात सध्या एक लाख १६ हजार दृष्टिहीन मतदारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. या सर्व मतदारांना आयोगातर्फे मतदार पावती पोहोचवण्याचे काम सुरू आहे. ही पावती ब्रेल लिपीमध्ये असेल. त्यामुळे या मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, खोली क्रमांक आदी माहिती मिळणार आहे.
निवडणूक आयोगातर्फे मतदान केंद्रांमध्ये उमेदवारांची नावे व त्यापुढे त्यांचे क्रमांकही ब्रेल लिपीत लिहिलेले असतील. त्यामुळे दृष्टिहीन मतदार मतदान करण्यासाठी जातील, तेव्हा मतदानयंत्रावरील (ईव्हीएम) ब्रेल क्रमांकाच्या आधारे मतदान करणे त्यांना शक्य होईल.
दरम्यान, दृष्टीहिन मतदारांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती ऑडिओ स्वरूपात देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग काम करत असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी कशा प्रकारे करता येईल, मतदारयादीतील नाव कसे शोधावे, तसेच मतदान कसे करावे, याविषयीही मार्गदर्शन या ऑडिओच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ऑडिओच्या पूर्ततेसाठी आयोग युद्धपातळीवर यावर काम करत असून राज्यातील पाचही टप्प्यांत ही सुविधा मतदारांना मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार; अडीच हजार समाजकंटकांवर पोलिस ठेवणार ‘वॉच’
त्या जाहिरातीला मान्यता
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोशल मीडियासह इतर माध्यमांवर करण्यात येणाऱ्या राजकीय पक्षांच्या जाहिरातींना यंदापासून निवडणूक आयोगाकडून प्रमाणित करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत दोन राजकीय पक्षांनी अर्ज केला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाला जाहिरातीसाठी मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अर्जही प्राप्त झाला असून लवकरच त्यावरही निर्णय घेतला जाणार असल्याचे चोक्कलिंगम यांनी यावेळी सांगितले.