• Thu. Mar 19th, 2026
    Buldhana News : गॅस टंचाईमुळे ‘पार्ले-जी’ बिस्कीटचे उत्पादन ठप्प, 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

    युद्धाची झळ आता बुलढाण्यातील खामगावला देखील बसताना दिसत आहे. इथे पार्ले-जी बिस्कीटचे उत्पादन करणारी कंपनी आहे. पण गॅसचा पुरवठा होत नसल्याने कंपनीत बिस्कीटांचं उत्पादन थांबलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बुलढाणा : पार्ले-जी बिस्कीट आणि प्रत्येक सर्वसामान्यांचं एक वेगळं नातं आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांना पार्ले-जी बिस्कीटाची आवड आहे. प्रत्येक घरात पार्ले-जी बिस्किटाचा एक चाहता असतोच. अनेकांनी आपल्या संघर्षाच्या काळात पार्ले-जी बिस्कीटाचा पुडा खावून दिवस काढल्याच्या देखील संघर्ष कथा आहेत. विशेष म्हणजे परवडणाऱ्या दरात पार्ले-जी बिस्किट उपलब्ध असतो. पण याच पार्ले-जी बिस्किटाच्या उत्पादनाला बुलढाण्यात ब्रेक लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामागे काय कारण आहे? याची देखील माहिती समोर आली आहे. गॅसच्या टंचाईमुळे पार्ले-जी बिस्कीटांच्या उत्पादनावर परिणाम पडल्याची माहिती समोर येत आहे.

    आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ कंपनी ही प्रसिद्ध ‘पार्ले-जी’ बिस्किटांचे उत्पादन करते. ती कंपनी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गेल्या गुरुवारपासून बंद पडली आहे. यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    शिवांगी बेकर्समध्ये प्रामुख्याने ‘क्रीम’ आणि ‘ग्लुकोज’ बिस्किटांचे उत्पादन घेतले जाते. येथील बिस्किट बनवण्याचे ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालतात. मात्र युद्धाच्या संकटामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी कंपनीला आवश्यक असलेला गॅस पुरवठा खंडित झाला आहे. ग्लुकोज ओव्हनसह संपूर्ण उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली आहे. या कंपनीत सुमारे 500 कामगार कार्यरत आहेत. उत्पादन बंद राहिल्याने या कामगारांच्या कुटुंबासमोर आर्थिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. “कंपनी लवकर सुरू झाली नाही तर कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागे”, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, खामगाव येथील येथील ‘शिवांगी बेकर्स’ कंपनीचे संचालक अभय अग्रवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा 11 मार्चपासून प्लांट बंद आहे. आम्हाला दररोज 3 टन गॅस लागतो. पण 11 तारखेपासून गॅस मिळत नाही. त्यामुळे आमचे दोन्ही लाईन थांबले आहेत. माझ्याकडे सुमारे 500 कामगार कामावर आहेत. 80 टन दररोजच्या बिस्किटचे उत्पादव होतं. यामध्ये 60 टन ग्लुकोजच्या बिस्किटचं उत्पादन होतं. तर 20 टक्के क्रीमच्या बिस्कीटचे उत्पादन होते. आमच्या कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. बिस्किट अत्यावश्यक सेवेत येतं. त्यामुळे आम्हाला गॅसचा पुरवठा व्हावा, अशी प्रशासनाला विनंती आहे”, अशी शिवांगी ब्रेकर्स कंपनीचे संचालक अभय अग्रवाल यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा