पालिकेच्या मालकीचे रस्ते, पदपथ तसेच रस्त्यांच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग्ज, फलक लावून शहर विद्रूप करण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबत उच्च न्यायालयानेही अनेकदा तीव्र शब्दांत पालिकेला फटकारले आहे. या फलकबाजीतून पालिकेला कोणताही आर्थिक फायदा होत नसून कारवाई करण्यासाठी आपले मनुष्यबळ खर्ची करावे लागते. या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ आणि दुभाजकांच्या जागांचा व्यावसायिक पद्धतीने वापर करण्यात येणार आहे. या जागांवर आता अधिकृत डिजिटल फलक उभारले जाणार आहेत. पालिकेने आपल्या जाहिरात मार्गदर्शक धोरणानुसार या फलकांची उभारी करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या.
निविदा मिळालेल्या कंपन्यांना दोनशे डिजिटल जाहिरात फलक म्हणजे दोन्ही बाजूने मिळून चारशे फलक लावता येणार आहेत. यासाठी मुंबईतील विभागनिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी हे जाहिरात फलक लावले जाणार आहे. बांधा, वापरा, हस्तांतरीत करा, या तत्वावर हे डिजिटल जाहिरात फलक लावले जाणार आहे. मुंबईत सध्या इमारत बांधकामे, मेट्रो, भुयारी मेट्रो, रस्ते, पूल यासह विविध प्रकारची सहा हजारांहून अधिक कामे सुरू आहेत. या जागांवर जाहिरात फलकांना परवानगी देण्याने पालिकेच्या महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
विविध कंपन्या आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार आहेत. त्यांना जाहिरातीसाठी चांगली ठिकाणे आवश्यक आहेत. ही बाब लक्षात घेऊन जाहिरातींमधून उत्पन्न वाढवण्यासाठी हा एक चांगला पर्याय असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जाहिरातींमधून वार्षिक तीस कोटींहून अधिक उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीला ९ वर्षांकरता जाहिरातींचे हक्क प्रदान केले आहेत. हा कालावधी संपुष्टात आल्यानंतर जाहिरातीचे फलक पालिकेला हस्तांतरित केले जातील. त्यावर कंपनीकडून कोणताही दावा केला जाणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या ठिकाणी झळकणार फलक
हाजी अली, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, दादर, परेल, वांद्रे कार्टर रोड, वांद्रे बँड स्टँड, सिद्धिविनायक मंदिर मार्ग, लिंकिंग रोड, एस. व्ही. रोड., अंधेरी, मालाड पश्चिम, मालाड न्यू लिंक रोड, एम. जी. रोड, शिव, मथुरादास रोड, अंधेरी कुर्ला रोड, चेंबुर, वर्सोवा, जुहू, खार, पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पवई, गोरेगाव, वडाळा, माहिम, रेक्लमेशन, लालबाग, जोगेश्वरी, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, मरोळ, मुलुंड, पूर्व मुक्त महामार्ग