• Mon. Mar 16th, 2026
    Beed Crime : रंगावरून अपमान, सततचा छळ; बीडमध्ये विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय, तिघांविरुद्ध गुन्हा

    माजलगाव तालुक्यात एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘तू रंगाने काळी आहेस’ असे टोमणे आणि पैशांच्या मागणीमुळे ज्योती पवार यांनी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    सासरच्या मंडळींनी रंगावरून टोमणे मारल्याने विवाहितेनं जीवन संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात रंगभेदाच्या टोमण्यांमुळे विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू रंगाने काळी आहेस” असे म्हणत सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून ज्योती पवार यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पतीसह सासू आणि सासऱ्यांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    लग्नानंतर सुरू झाला छळ

    या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील तालखेडा गावातील ज्योती पवार या महिलेचा विवाह २०१८ मध्ये तळतांडा येथील कृष्णा पवार यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकत तिचा छळ सुरू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

    रंगावरूनही टोमणे

    सासरच्या मंडळींकडून “तू रंगाने काळी आहेस, त्यामुळे आम्हाला आवडत नाहीस,” असे म्हणत ज्योतीचा सातत्याने मानसिक छळ केला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesPune Crime : कॉलेजसमोर किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर भीषण हल्ला, वाघोली पोलिसांकडून तपास सुरू

    विष प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू

    या सततच्या छळाला कंटाळून ज्योतीने १२ जानेवारी २०२६ रोजी विष प्राशन केले. त्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगर आणि नंतर पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १८ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.

    पतीसह तिघांवर गुन्हा

    घटनेनंतर खचलेल्या आई-वडिलांना स्वतःला सावरण्यात वेळ गेला. त्यामुळे सुरुवातीला तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र आता १३ मार्च रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्योतीच्या सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिचा पती कृष्णा पवार, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई पवार यांचा समावेश आहे.

    दरम्यान, सध्या या प्रकरणाचा अधिक तपास माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा