• Sat. Jun 6th, 2026
    Navi Mumbai Crime : दोन वर्षांचं प्रेम, लग्नाचा आग्रह अन् वाद; भांडुपच्या दिव्यानं रबाळेतील हॉटेलमध्ये जीवन संपवलं, प्रियकर विवेकला अटक

    नवी मुंबईतील रबाळे परिसरात एका २४ वर्षीय तरुणीने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लग्नास नकार आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप असून, रबाळे पोलिसांनी प्रियकर विवेक सिंग याला अटक केली आहे.

    लग्नाला नकार दिल्याने तरुणीने संपवले जीवन, रबाळेमधील घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, नवी मुंबई : प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या वादातून २४ वर्षीय तरुणीने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली असून त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या देवेंद्र पुरी (वय २४) ही भांडुप येथील रहिवासी होती. तिने नवी मुंबईतील रबाळे परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

    वडिलांची पोलिसांत तक्रार

    या प्रकरणी दिव्याचे वडील देवेंद्र लक्ष्मीनारायण पुरी (वय ४७, धंदा – नोकरी, रा. १/५, राजाराम यादव कंपाऊंड, उत्कर्ष नगर रोड, भांडुप पश्चिम, मुंबई – ४०००७८) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, दिव्या आणि विवेक राजेश सिंग (वय २७) यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात दोघांमध्ये वारंवार भेटीगाठी होत होत्या. दिव्याने विवेककडे लग्नासाठी आग्रह धरला होता. मात्र विवेक हा लग्नाबाबत वारंवार टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जाते.

    मानसिक व शारीरिक त्रासाचा आरोप

    तसेच विवेककडून दिव्याला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या त्रासाला आणि लग्नाबाबतच्या वादाला कंटाळून दिव्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत रबाळे परिसरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

    Maharashtra TimesBuldhana News : गॅस टंचाईमुळे ‘पार्ले-जी’ बिस्कीटचे उत्पादन ठप्प, 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

    मोबाईल चॅट्स व कॉल रेकॉर्ड्स तपासात

    घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान दिव्याच्या मोबाईलमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स जप्त करण्यात आले असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

    आरोपी अटकेत

    दरम्यान, आरोपी विवेक राजेश सिंग (वय २७) याचा पत्ता – रूम नं. १०३/९९६, आदर्श सेवा मंडळ, गणेश नगर, बॉडीग्लास जिमजवळ, मानपाडा, ठाणे (पश्चिम), जि. ठाणे – ४००६०७ असा आहे. तो नवी मुंबईतील वाशी येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

    या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला १४ मार्च २०२६ रोजी अटक केली आहे.

    Maharashtra TimesBeed Crime : रंगावरून अपमान, सततचा छळ; बीडमध्ये विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय, तिघांविरुद्ध गुन्हा

    पुढील तपास सुरू

    या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण काकडे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा