महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून यासंदर्भात करण्यात आलेल्या पाहणीत ही बाब पुढे आली आहे. शहरात सुमारे ५० ठिकाणांवर अज्ञात व्यक्तींकडून बांधकाम साहित्याचा कचरा टाकण्यात आल्याचे आढळले. महापालिकेने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती केली असून, या कंपनीद्वारे भांडेवाडी येथे यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात आला आहे.
उपद्रव शोध पथकाकडून २२ मार्चपासून शहरातील विविध झोनमधील रस्ते, फुटपाथ, सार्वजनिक जागांची पाहणी करण्यात आली. यामध्ये खासगी व शासकीय संस्थांच्या कार्यालयांचाही समावेश होता. या संस्थांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांचा समावेश होता. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात १२८ कर्मचाऱ्यांनी ही पाहणी केल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अशाप्रकारचा कचरा नियमितपणे टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. महल्ले यांनी दिली. कारवाई करण्याची झोन पातळीवर जबाबदारी स्वच्छता अधिकारी, निरीक्षक यांना देण्यात आली आहे. बांधकाम साहित्य कचरा अधिनियम २०१६अंतर्गत प्रतिवाहन ५ हजार ५०० रुपये दंड आकरण्याची तरतूद आहे. १ एप्रिलपासून यात ५०० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईचे चालान देण्यात येणार आहे.
धरमपेठ झोन आघाडीवर बांधकाम साहित्याचा कचरा रस्त्यावर टाकण्यामध्ये धरमपेठ झोन आघाडीवर असल्याचे पुढे आले आहे. या झोनमध्ये ५४ ठिकाणी हा कचरा आढळून आला. तर लकडगंज झोनमध्ये ही संख्या सर्वात कमी असून तेथे १५ ठिकाणी हा कचरा आढळून आला. महापालिकेने अज्ञात व्यक्तींकडून तब्बल ५० ठिकाणी टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्याच्या कचऱ्याची उचल करत भांडेवाडी येथे वाहतूक केली आहे. या पाहणीत आढळून आलेल्या ३५ ठिकाणांमध्ये शासकीय संस्था व कार्यालयांकडून सतत बांधकाम साहित्याचा कचरा टाकण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. उपद्रव शोध पथकाकडून अशा ठिकाणांची यादी संपूर्ण माहितीसह घनकचरा विभागाला सादर करण्यात आली आहे. यातील अनेकांना नोटीस बजावण्यात आल्या. या कचऱ्याची उचल करून भांडेवाडी येथे टाकावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.