• Mon. Nov 25th, 2024

    परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी बुधवारी, २७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरता ठरेना. गुरुवारी सायंकाळपर्यंत संभ्रम कायम होता. त्यामुळे सलग दोन टर्म परभणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार संजय जाधवांची हॅट्रिक नक्की रोखणार कोण, याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही.महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राजेश विटेकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. २०१९ च्या निवडणुकीत विटेकर यांनी क्रमांक दोनची मते घेतली होती. या लॉजिकवर महायुतीकडून विटेकर हे प्रबळ दावेदार ठरले आहेत. त्यादृष्टीने विटेकरांनी मोर्चेबांधणीही सुरू केलेली आहे. परंतु, महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाल्यानंतर भाजपचे लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनीही नेत्यांच्या गाठीभेटी आणि संवाद सुरूच ठेवला आहे. बोर्डीकरांना डावलून केवळ बोर्डीकर विरोधापोटी भाजपतील अन्य इच्छुक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेश पातळीवरील प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेतलेली बैठकही चांगलीच चर्चेत आली आहे. मात्र, बदलत्या राजकीय घडामोडींनंतर महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर परभणीचे उमेदवार निश्चित झाल्याचीही चर्चा सुरूच आहे. दोन एप्रिलला जानकर महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या पोस्टही समाज माध्यमातून व्हायरल झालेल्या आहेत. या चर्चेत भाजपचे डॉ.केदार खटिंग व आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर या इच्छुकांचीही उमेद कायम आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष भाकपने कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना, तर सकल मातंग समाजाच्या वतीने लालसेनेचे कॉम्रेड गणपत भिसे यांना परभणीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी, एआयएमआयएम पक्ष यांच्या भूमिका तसेच मराठा समाज व ओबीसींची रणनीती नेमकी काय राहील याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

    महादेव जानकरांचा धक्का; शरद पवारांना साथ देण्याची भाषा अन् २४ तासांत देवेंद्र फडणवीसांशी युतीची गाठ

    ▪️’धनुष्यबाण’च हवा

    १९९८ चा अपवाद वगळता १९८९ पासून मागील ३३ वर्षाच्या कालावधीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला प्रमाण मानत, परभणी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण तसेच शहरी जनतेने मोठ्या मताधिक्याने धनुष्यबाण या चिन्हाला विजयी केलेले आहे. त्यामुळे परभणी लोकसभेकरिता धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक होणे आवश्यक आहे, असे मत शिवसेना शिंदे गटाचे परभणी महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed