• Sat. Sep 21st, 2024

लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर ‘बॅटमॅन’चा वॉच, रेल्वे स्थानकांच्या तिकीटविक्रीत सरासरी ८ टक्क्यांनी वाढ

लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर ‘बॅटमॅन’चा वॉच, रेल्वे स्थानकांच्या तिकीटविक्रीत सरासरी ८ टक्क्यांनी वाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘बॅटमॅन’ पथक स्थापन केले. या पथकाची तपासणी रेल्वेच्या पथ्यावर पडली असून रात्रीच्या वेळी प्रवासी तिकीट काढून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. बॅटमॅन पथकांची तपासणी सुरू झाल्यानंतर संबंधित रेल्वे स्थानकांच्या तिकीटविक्रीत सरासरी ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.रात्रीच्या वेळी लोकलमधील विनातिकीट आणि द्वितीय श्रेणी तिकीट-पासधारक प्रवाशांची संख्या वाढती असल्याने प्रथम श्रेणीच्या प्रवाशांना गर्दीला तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर वातानुकूलित लोकलमध्ये ही विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढती होती. विशेषत: रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तक्रारी वाढल्याने पश्चिम रेल्वेने बॅटमॅन पथकाची नियुक्ती केली.
मुंबई अग्निशमन दलात ९१० जवानांची भरती, ४५९ जवान कर्तव्यावर हजर, २५०हून अधिक स्त्रीशक्ती!

दादर : ४५.९५ टक्के तिकीटविक्री वाढली


दादर स्थानकात सोमवार-मंगळवारी (४-५ मार्च) बॅटमॅन पथकाची नियुक्ती करून तपासणी करण्यात आली होती. या पथकामुळे संबंधित स्थानकांत टीसींचा वावरही वाढवला आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून सोमवार-मंगळवारी (११ – १२) मार्चमध्ये तिकीटविक्रीत ४५.९५ टक्के वाढ झाली आहे. बॅटमॅन पथकांच्या तपासणीआधी २,५७९ तिकीटांची विक्री झाली होती. तपासणीनंतर ही विक्री ३,७६४ पर्यंत पोहोचली, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

विरारमध्ये सर्वाधिक तिकीट खरेदी

बोरिवलीमध्ये ११.८३ टक्के, विरारमध्ये ६२.१६ टक्के, कांदिवलीमध्ये १७.४४ टक्के आणि भाईंदरमध्ये १०.५५ टक्के तिकीट विक्री वाढली आहे. या सर्व स्थानकांत बॅटमॅन पथकाने तपासणी केली होती. तपासणी केल्यानंतर पुढच्या आठवड्याला विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले.

दंडापेक्षा तिकीट बरे

रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेने बॅटमन पथक स्थापन केले आहे. रात्री १० ते सकाळी ६पर्यंत हे पथक कार्यरत राहणार आहे. पथकाकडून रात्री अचानकपणे तपासणी सुरू करण्यात येते. यामुळे शेकडो रुपयांचा दंड भरण्यापेक्षा १० ते २० रुपयांचे तिकीट काढून प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल आहे.

बॅटमॅन पथकांच्या तपासणीनंतर तिकीटविक्रीतील वाढ

स्थानक – तपासणी आधी – तपासणी नंतर -वाढ (%)

दादर – २,५७९ – ३,७६४ -४५.९५

बोरिवली – २,५७९ -२,८८४ – ११.८३

विरार – १,३८२ – २,२४१ -६२.१६

कांदिवली – ९६९ – १,१३८ – १७.४४

भाईंदर – १,०५२ – १,१६३ – १०.५५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed