दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असून, प्रचाराच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्याचा दावा गोडसे यांनी केला. त्यामुळे आज, शनिवारी शालिमार येथील हनुमान मंदिरात आरती करून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचा दावाही खासदार गोडसेंनी केल्याने महायुतीत नवा पेच निर्माण झाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून सध्या महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. हेमंत गोडसे सलग दोन वेळा निवडून आल्याने या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा मूळ दावा आहे. मात्र, नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. गोडसे यांनी उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर शक्तिप्रदर्शन केले. भाजपचे तीनही आमदार, स्थानिक पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनीदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकचा उमेदवार भाजपचाच असावा, अशी गळ घातली. भाजप-शिवसेनेत उमेदवारीसाठी चढाओढ सुरू असताना अचानक या जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे गोडसे यांनी बुधवारी पुन्हा पदाधिकाऱ्यांसह पुन्हा मुंबईकडे धाव मुख्यमंत्र्यांकडे तळ ठोकला. परंतु, तरीही तिढा सुटत नसल्याने अखेरीस गोडसेंना शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीविनाच परतावे लागले. मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने शनिवारी गोडसेंसह पालकमंत्री भुसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. दोन तासांच्या चर्चेनंतर शिंदेंनी गोडसेंना उमेदवारीचे आश्वासन दिले असून, प्रचाराला लागण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर गोडसे समर्थकांसह नाशिककडे परतले. जागावाटपाचा पेच कायम असला, तरी ते आज, शनिवारपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
सामूहिक राजीनाम्याचा इशारा
एकीकडे नाशिकच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात द्वंद्व सुरू असतानाच दुसरीकडे भाजपही आक्रमक झाला आहे. भाजपच्या आमदारासंह पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाशिकच्या जागेसाठी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर भुजबळांचे नाव समोर येताच पदाधिकाऱ्यांनी शांततेचे धोरण स्वीकारले होते. परंतु, शुक्रवारी भाजपच्या आठ ते दहा मंडल अधिकाऱ्यांनी नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी सामूहिक राजीनाम्याचा इशारा पक्षाला दिला. त्यामुळे भाजपसमोरील पेचही वाढला आहे.
माझी उमेदवारी निश्चित असून, ती दोन दिवसांत जाहीर होणार आहे. मला प्रचाराला लागण्याच्या सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केल्या आहेत. त्यानुसार आज, शनिवारपासून प्रचाराला सुरुवात करणार आहे.-हेमंत गोडसे, खासदार