महाराष्ट्रातील सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागा काँग्रेसला सोडण्यास आघाडीतील मित्रपक्षांनी नकार दिला, तर इंडिया आघाडीतील घटकपक्षांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसला हायकमांडने हिरवा कंदील दाखवला आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु मित्रपक्षांना जागा सोडून आघाडीची किंमत मोजण्यास ते तयार नाहीत. लोकसभेच्या अशा वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध लढले, तर मतविभाजन होऊन त्याचा फटका महायुतीला होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते यावर तोडगा काढून कुठला सुवर्णमध्य काढणार का, किंवा ठाकरे गटाने जाहीर केलेल्या सांगली, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा काँग्रेसला सोडल्या जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सांगलीवरुन चांगलीच जुंपली
सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेसकडून विशाल पाटील लोकसभा लढवण्यास उत्सुक होते. विश्वजीत कदम त्यांच्यासाठी फील्डिंग करताना पाहायला मिळाले. मात्र ठाकरेंनी पैलवान चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश देत त्यांना थेट सांगलीतून तिकीट जाहीर केलं. तेव्हापासूनच काँग्रेस नाराज होतं. अखेर ठाकरेंनी अधिकृत उमेदवार यादी जाहीर करताना त्यांचं नाव समाविष्ट केल्याने काँग्रेस नेत्यांचा तीळपापड झाला. ठाकरेंनी युतीधर्माचं पालन न केल्याचा आरोप केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
विशेष म्हणजे, कोल्हापूर आणि रामटेक या दोन मतदारसंघांत शिवसेनेचे विद्यमान खासदार असूनही (दोन्ही खासदार शिंदे गटात) जागा काँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या. तर युतीत परंपरेने लढवत आलेली अमरावतीची जागाही शिवसेनेने काँग्रेसला सोडली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीची जागा लढवण्याचा आग्रह ठाकरे गटाने धरला होता. महत्त्वाचं म्हणजे उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य या मुंबईतील दोन्ही जागांवरही शिवसेनेचे विद्यमान खासदार असतानाही (दोन्ही खासदार शिंदे गटात) काँग्रेसने त्या जागांचाही हट्ट धरला होता. परंतु तिथे ठाकरेंनी उमेदवार दिले.